पुढील आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा फॉर्म्युला


नवी दिल्ली – : सीबीएसई (CBSE) बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावला जाणार याचा फॉर्म्युला येत्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. 12 सदस्यांची समिती यासाठी स्थापन करण्यात आली होती. 14 जून म्हणजेच, आजपर्यंत आपला अहवाल या समितीला सादर करायचा आहे. त्यानंतर शिक्षण मंत्रालय बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकालासंदर्भातील माहिती जाहीर करणार आहेत.

दरम्यान, शिक्षण मंत्रालयाच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आणि मूल्यांकन कसे केले जाणार, हे ठरवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी विपिन कुमार यांच्यासह 12 लोकांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 4 जून रोजी या संदर्भातील नोटीफिकेशन सीबीएसईने जाहीर केले होते. हे नोटीफिकेशन जारी करताना सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, या समितीमध्ये 12 सदस्य आहेत. ही समिती विद्यार्थ्यांचे निकाल आणि त्यांची मार्कशीट तयार करण्यासाठी नियमावली तयार करणार आहे.

सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, समितीला 10 दिवसांच्या आत आपला अहवाल तयार करण्यास सांगितले होते. यानुसार, शिक्षण मंत्रालयाकडे 14 जूनपर्यंत 12वीचे निकाल तयार करण्याचा फॉर्म्युला ही समिती जाहीर करणार आहे. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर केला जाणार, यासंदर्भातील माहिती जाहीर केली जाईल.

दरम्यान बारावीच्या प्रॅक्टिकल आणि आंतरिक मुल्यांकनाचे आकडे अपलोड करण्याची शेवटची तारिख 28 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. ज्या शाळांनी आतापर्यंत बोर्डाचे प्रॅक्टिकल आणि आंतरिक मूल्यांकनाचे गुण नोंदवलेले नाहीत, त्यांनी 28 जूनपर्यंत हे गुण सीबीएसईकडे नोंदवायचे आहेत.