तिसऱ्या टप्प्यात दाखल झालेल्या सांगलीतील निर्बंधात शिथिलता; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?


सांगली : सांगली जिल्हा कोरोना पॉझिटिव्हिटी रेटनुसार तिसऱ्या टप्प्यात गेला असल्यामुळे आजपासून जिल्ह्यात निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्यात येत आहे. मागील आठवड्यात सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्के एवढा होता. आठवड्याभरात पॉझिटिव्हिटी दरात घट झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आजचा पॉझिटिव्हिटी रेट 7.86 टक्के आहे. आज सकाळी 5 वाजल्यापासून 21 जून 2021 सकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

राज्यातील जिल्ह्यांना कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारीनुसार 1 ते 5 टप्प्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. 10 जून 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त पण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारी 25 टक्क्यापेक्षा जास्त पण 40 टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्याने, या टप्प्याचे निर्बंध सांगली जिल्ह्यात लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

सांगली जिल्ह्यात नव्या निर्बंधांनुसार कोणकोणत्या गोष्टींना सूट?

 • सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व दुकाने (सर्व बाजारपेठ, कापडपेठ, सराफपेठ) सुरु राहणार आहेत.
 • सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व किराणा, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दूध व दुग्धजन्य पदार्थ, डेअरी, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स व सर्व प्रकारची खाद्य दुकाने (मटन, चिकन, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह) सुरु राहतील.
 • सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंडई सुरु राहतील. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार मात्र बंद राहतील.
 • सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केटमधील सर्व व्यवहार सुरु राहतील.
 • सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्तीची सेवा देणाऱ्या, तसेच पशुखाद्य दुकाने यांच्या आस्थापना सुरु राहतील.

काय सुरु?

 • सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी
 • जिल्ह्यात चित्रपट, मालिका चित्रीकरणाला परवानगी
 • हॉटेल, रेस्टॉरंट, बारचालकांना 50 टक्के क्षमतेने व्यवसाय करण्यास परवानगी
 • शासकीय,खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहार नियमित सुरू राहणार
 • सलून, जिम सुरु राहणार, क्रीडांगणे, मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 9 पर्यंत परवानगी
 • पूर्ववत राज्याबाहेरील परीक्षांना परवानगी

काय बंद?

 • शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद
 • शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस बंद धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मॉल, जलतरण तणाव, सभागृह बंदच
 • भाजी मंडई वगळता सर्व आठवडा बाजारही बंदच राहणार