नोवाव्हॅक्स लस कोरोना विरोधात ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा!


नवी दिल्ली – गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरलेले असतानाच शास्त्रज्ञांना कोरोना विरोधातील लस निर्मितीत आणखी एक यश मिळाले आहे. प्रत्येक देश आता कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देत आहे. अशातच लस निर्मिती करणाऱ्या नोवाव्हॅक्स कंपनीने आणलेली लस कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट विरोधात देखील ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात यावर कंपनीने अभ्यास केल्यानंतर माहिती जाहीर केली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटसोबत नोवाव्हॅक्स या अमेरिका स्थित कंपनीने करार केला आहे. याअंतर्गत नोवाव्हॅक्सचे २०० डोस सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार केले जाणार आहेत. कोरोना विरोधात नोवाव्हॅक्स लस ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे आणि सुरुवातीच्या आकडेवारीनुसार लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, नोवाव्हॅक्सची लसची साठवण आणि वाहतूक करणे अतिशय सोपे असल्यामुळे विकसनशील देशांमध्ये लस पोहोचविण्याच्या उद्दिष्टांमध्ये नोवाव्हॅक्स लस खूप मोठे योगदान देण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत नोवाव्हॅक्सच्या वापराला अमेरिका आणि युरोपमध्ये मंजुरी मिळेल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मंजुरी मिळेपर्यंत दरमहा १० कोटी डोसची निर्मिती करण्यासाठी कंपनी सक्षम असल्याचे कंपनीचे प्रमुख स्टेनली एर्क यांनी म्हटले आहे.