मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान मिळण्याची शक्यता


मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे हे दिल्लीला रवाना झाले असून नारायण राणे यांचा हा दौरा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांची स्थान मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दिल्ली दौऱ्यात नारायण राणे हे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपने राज्यसभेवर पाठवले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच, मराठा चेहऱ्याच्या निमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. पण या दाव्यामध्ये राजकीय विश्लेषकांना तथ्य वाटत नाही.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या चर्चा सुरु आहे. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्र्यांची अदलाबदली, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचे केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज असल्यामुळे त्यांच्या जागी नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा शिवसेनेला थेट अंगावर घेण्याचा मुद्दा असो, सध्या भाजपकडे नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता नसल्यामुळे नारायण राणे यांची ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, कोकणात भाजप वाढविण्यासाठी मदत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.