ग्रेट भेट; संभाजीराजे भेटीनंतर उदयनराजेंचे वक्तव्य; उद्या आमच्यावरही हल्ला होईल अशी वेळ येऊ शकते


पुणे – छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आंदोलनाची हाक दिल्यानंतर आज उदयनराजेंची भेट घेतली. दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर पुण्यात चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दोघांमध्ये बहुतांश मुद्द्यावर एकमत झाल्याचे संभीजीराजे यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्या आमच्यावरही हल्ला होईल अशी वेळ येऊ शकते अशी भीती उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

आम्ही दोघे एकाच घराण्यातील आहोत. मी संभाजीराजे यांनी मांडलेल्या विचारांशी सहमत असल्याचे उदयनराजे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यावेळी देशाची पुन्हा फाळणी करायची की नाही याचा विचारा करावा असे सांगताना आजचे राज्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याबद्दल मी बोलत असून केंद्राला पण लागू होते. प्रत्येक राज्याला लागू होते असल्याचेही ते म्हणाले. अध्यादेश काढून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी, यावेळी त्यांनी केली.

कधीही आपण जात पाहिलेली नाही, पण लहानपणाचे मित्रदेखील आता अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. याच्याशी समाजाचा काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून यांना फक्त राजकारण करायचे आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार असल्याची भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

दोन्ही छत्रपती घराण्यांना फार मोठा सामाजिक वारसा आहे. आम्ही समाजाला नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. म्हणून उदयनराजेंची आपण भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचे एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. पूर्वीपासून आम्ही एकमताने काम करत आल्याचे संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.