चिराग पासवान यांच्या विरोधात पाच खासदारांनी पुकारले बंड


पटना – रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाच्या पाच खासदारांनी बंडांचे निशाण फडकावले असून, लोजपमध्ये फूट पडल्याचे समोर आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना चिराग पासवान यांच्यावर नाराज असलेल्या खासदारांनी पत्र दिल्याचे वृत्त आहे. या खासदारांनी आपल्याला वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पाचही खासदार पक्षांतर करण्याच्या वाटेवर असून, असे झाल्यास लोक जनशक्ती पार्टीला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये हे पाचही खासदार सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पार्टीची सूत्रे आल्यापासून पाचही खासदार नाराज होते. चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक जदयू आणि भाजपसोबत न लढत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे खासदारांच्या नाराजीत आणखी भर पडली होती. लोक जनशक्ती पार्टीत तेव्हापासूनच फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती. पण या दिशेने कधी पावले टाकली जाणार याबद्दल मात्र, खात्रीने कुणीही बोलत नव्हते.

चिराग पासवान यांचे काका आणि हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार पशुपती कुमार पारस हे या बंडामागे असल्याचे बोलले जात आहे. मनमानी कारभार चिराग पासवान करत असल्यामुळे ते नाराज होते आणि जदयू खासदाराच्या संपर्कात होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना या खासदारांनी पत्र देत चिराग पासवान यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. आपल्याला वेगळा गट समजण्यात यावे, असे या खासदारांनी पत्रात म्हटलेले आहे.

बंडाच्या तयारीत असलेल्या लोक जनशक्ती पार्टीच्या खासदारांची पशुपती कुमार पारस (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली केशर अशी नाव आहेत. पाच खासदार एकाच वेळी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या वृत्तानंतर लोजपासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. खासदार नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये हे पाचही प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. चिराग पासवान यांनीही हे खासदार बंड करणार असल्याच्या वृत्तावर भूमिका मांडली आहे. माझ्या वडिलाच्या निधनाच्या धक्क्यातून मी बाहेर आलो आहे, तर या धक्क्यातूनही बाहेर येईनच, असे त्या्ंनी म्हटले आहे.