मराठा आरक्षणावर छत्रपती शाहू महाराजांचे मोठे वक्तव्य


कोल्हापूर – सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. राज्यातील वातावरण सध्या मराठा आरक्षणावरुन तापलेले असल्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते. जवळपास एक तास अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात बैठक सुरु होती. बैठकीनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.

सर्व गोष्टींवर आमच्यात चर्चा झाली असून यासंबंधी सविस्तर अजित पवार सांगतील, असे छत्रपती शाहू महाराजांनी यावेळी सांगितले. तसेच समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगले करता येईल, ते करा असे मार्गदर्शन केले असल्याची माहिती त्यांनी दिली. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे, ते सर्व केलं पाहिजे, असे मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, सरकारचे मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आमच्यात आंदोलनाबाबत कोणती चर्चा झालेली नाही.

आता मराठा समाजाने स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहणं गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास केला नाही, त्यांनी तो करणे गरजेचा आहे. त्याचे मराठीत भाषांतर करुन समजून घेतले पाहिजे. तसेच न्यायालयाचा अवमान होता कामा नये, असेही ते म्हणाले.

जर केंद्र सरकारने येथे लक्ष दिले आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचे पाऊल टाकता येईल, हे आधीच सांगितले पाहिजे. कायद्यात काय बसते हे सांगायला मी काही कायदेपंडित नसल्याचे यावेळी ते म्हणाले. मराठ्यांसाठी जास्तीत करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटले तर कसे आणून देणार, अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.