जमीन खरेदी भ्रष्टाचाराचे आरोप श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने फेटाळले


अयोध्या – अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर उभारण्याचे काम सुरू असून, केंद्र सरकारने या कामावर देखरेख ठेवण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थापन केली आहे. मंदिरासाठी या ट्रस्टने जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या व्यवहारावरून आता वाद उभा राहिला आहे. काही दस्तावेज दाखवत ट्रस्ट सचिव चंपत राय यांच्यावर आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तर जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचारा झाल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नेते आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनीही केला आहे. मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेली जमीन अवघ्या काही मिनिटांत दोन कोटींवरून १८.५ कोटींना खरेदी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान ट्रस्टने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, त्यावर खुलासाही केला आहे.

राम मंदिर जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संजय सिंह आणि माजी आमदार पवन पांडे यांनी केल्यानंतर ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. कमीत कमी दराने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिरासाठी जमीन खरेदी केली आहे. काही राजकीय नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. आरोप करणारे लोक राजकारणाशी संबंधित असून, राजकीय द्वेषातून आरोप करत आहेत. हे समाजाची दिशाभूल करण्यासाठी केले जात असल्याचे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम मंदिरासंदर्भातील मुद्द्यावर निकाल दिल्यानंतर देशभरातून लोक अयोध्येत जमीन खरेदीसाठी येऊ लागल्यामुळे जमिनीचे भाव वाढले. माध्यमांमध्ये ज्या प्लॉटची चर्चा होत आहे, ती जागा रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेली मोक्याची जागा आहे. आतापर्यंत जी जमीन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट मंदिरासाठी खरेदी केली, ती कमीत कमी किंमतीत खरेदी केल्याचे राय यांनी म्हटले आहे.

संमती घेण्यात आल्यानंतर संबंधित कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. सर्व प्रकारची कोर्ट फीस आणि स्टॅम्प पेपर सर्व ऑनलाईन खरेदी केले जात आहे. जमिनीची खरेदी संमती पत्राच्या आधारावरच केली जात आहे. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे जमिनीचा मोबदला विक्रेत्याच्या खात्यावर ऑनलाईन जमा केला जातो, असे राय यांनी म्हटले आहे.

दरम्यान जमीन खरेदी प्रकरणावरून श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर आपचे राज्यसभेतील खासदार सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. दोन कोटी रुपयांत विकत घेतलेल्या जमिनीचा भाव प्रत्येक सेकंदाला साडेपाच लाखाने वाढत गेला. भारतच काय तर जगातील कुठल्याच जमिनीचा भाव एवढ्या वेगाने वाढत नाही. हे उघडपणे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारकडे मी अशी मागणी करतो, की याप्रकरणाची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी व्हावी.

तसेच या गंभीर भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावे. हा प्रश्न देशातील करोडो राम भक्तांसह राम मंदिराच्या निर्माणासाठी आपल्या कष्टाने कमावलेले पैसे मंदिरासाठी दान देणाऱ्यांच्या विश्वासाचाही असल्याचे सिंह म्हटले आहे. तर दुसरीकडे असाच आरोप सपाचे नेते पवन पांडे यांनीही केला आहे. पांडे म्हणाले ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांना बाबा हरिदास यांनी विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विकली. काही मिनिटांत जमिनीचा भाव दोन कोटींहून १८.५ कोटी कसा होऊ शकतो. याची सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे.