अहमदाबाद – आम आदमी पार्टीने गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) सर्व जागा लढवणार असून आज (मंगळवार) पत्रकारपरिषदेत ही घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली.
२०२२ मध्ये गुजरात विधानसभेच्या सर्व जागा लढवणार ‘आप’
गुजरातमध्ये विधानसभा निवडवणुकी अगोदर आम आदमी पार्टीचा प्रसार होण्यासाठी केजरीवाल आज अहमदाबादेत पोहचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत यावेळी काही जणांनी आपमध्ये प्रवेश देखील केला. आम आदमी पार्टीचे उमेदवार विधानसभेच्या सर्व जागा लढवतील. गुजरातमधील नागरिक विचार करत आहेत की, जर दिल्लीमध्ये वीज मोफत दिली जात आहे, तर मग येथे का नाही? तशाप्रकारे येथील रूग्णालयांची परिस्थिती देखील मागील ७० वर्षांपासून सुधारलेली नाही. पण आता परिस्थिती बदलेल, असे यावेळी अरविंद केजरीवाल यांनी बोलून दाखवले.
गुजरातची आज जी अवस्था ते भाजप व काँग्रेस सरकारचे कारस्थान आहे. एकाच पक्षाचे सरकार मागील २७ वर्षांपासून आहे. असे म्हणतात की भाजपच्या खिशात काँग्रेस आहे. गुजरातमधील व्यापारी घाबरलेले आहेत. शिक्षण खराब आहे आणि चांगल्या दर्जाची रूग्णालये नाहीत, कोरोना काळात गुजरात अनाथ झाले होते. आज गुजरातला एक सक्षम पर्याय मिळाला आहे. गुजरातमध्ये वीज एवढी महाग का आहे? गुजरातमधील रुग्णालये व शाळा चांगल्या का नाहीत? पण हे आता होईल, असा विश्वासही यावेळी केजरीवाल यांनी माध्यमांद्वारे गुजरातच्या जनतेला दिला.