जगातील महाग आंबा, खाण्यापेक्षा गिफ्ट देण्यासाठीच प्रसिद्ध

जगभरात अनेक देशातील नागरिकांचे आंबा हे आवडते फळ आहे. फळांचा राजा असा सन्मान या फळाला मिळाला तो याच कारणाने. भारत आंबा उत्पादनात अग्रेसर देश आहेच पण येथे असंख्य जातीचे आंबे मिळतात. मूल्याच्या दृष्टीने भारतात नूरजहा आंबा सर्वात महाग असला तरी तो जगातील सर्वात महाग आंबा नाही. जगातील सर्वात महाग आंबा पिकतो जपान मध्ये. ताईयो नो तामागो म्हणजे एग ऑफ द सन असे या आंब्याच्या जातीचे नाव आहे. जपानच्या मियाजाकी प्रांतात हा पिकविला जातो.

दरवर्षी या आंब्याची मोठी विक्री होते पण नेहमीप्रमाणे बाजारात जाऊन तो हवा तेव्हा खरेदी करता येत नाही. कारण या आंब्याची शेती स्पेशल ऑर्डर मिळाल्यावर केली जाते. म्हणजे अगोदर ठरवून या आंब्याची खरेदी करावी लागते. या आंब्याचे वैशिष्ट म्हणजे तो अर्धा लाल आणि अर्धा पिवळा असतो आणि उन्हाळा आणि थंडी याच्या मधल्या सिझन मध्ये पिकविला जातो. या आंब्याच्या स्वादात अननस आणि नारळ यांच्या हलकासा स्वाद असतो.

झाडाला फळ लागले की ते जाळीदार कपड्यात बांधले जाते. फळावर सूर्य किरणे पूर्ण पडवीत याची काळजी घेतली जाते. उन्हातच फळ पिकते आणि जाळीत पडते. हा आंबा तोडला जात नाही आणि ग्राहकांना तयार पिकलेला आंबा मिळतो. या पद्धतीने पिकविल्यामुळे त्याचा स्वाद आणि पौष्टिकता वाढते असे समजतात. हे आंबे दुकानात मिळत नाहीत तर त्याचे लिलाव केले जातात.

२०१७ मध्ये दोन आंब्यांसाठी ३६०० डॉलर्स म्हणजे २ लाख ७२ हजार रुपये बोली लागली होती. एकेक फळ ३५० ग्रामचे असते आणि एक किलोचा दर ३ लाख रुपयापर्यंत जातो. जपानी संस्कृतीत या आंब्याला खास मान्यता आहे. हा आंबा गिफ्ट केला जातो. सूर्याच्या उन्हात तो पिकतो म्हणून ज्याला गिफ्ट केला जातो त्याचे नशीब सूर्यासारखे रोशन होते असा समज आहे. विशेष म्हणजे ज्यांना हा आंबा गिफ्ट मिळतो ते लोक सुद्धा आंबा खाण्यापेक्षा तो सांभाळून ठेवण्यास अधिक महत्व देतात.