बेजोस यांच्यासोबत अंतराळात जाणाऱ्या सहप्रवाशाची निवड झाली

धनकुबेर आणि अमेझॉन सीईओ जेफ बेजोस येत्या २० जुलै रोजी त्यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीच्या शेफर्ड स्पेसशिप मधून भाऊ मार्क सोबत अंतराळ प्रवास करणार आहेत. त्याच्या शेजारच्या सीटचा सहप्रवासी कोण होणार आणि त्यासाठी किती पैसे मोजले जाणार याची उत्सुकता आता संपली आहे. या जागेसाठी केलेल्या लिलावात २८ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २०५ रुपये बोली लावलेल्या व्यक्तीला बेजोस यांच्या शेजारची सीट मिळणार आहे. या व्यक्तीचे नाव उघड केले गेलेले नाही.

या सीट साठी १० मिनिटांचा लिलाव केला गेला. जगाच्या १५९ देशातून त्यासाठी ७६०० लोकांनी बोली लावली. त्यातील शेवटच्या तीन मिनिटात सर्वाधिक बोली मिळाली असे समजते, बेजोस यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्ट मध्ये अंतराळ प्रवासाविषयी लिहिले आहे. ते म्हणतात,’ अंतराळातून पृथ्वी पाहणे तुमच्यात बदल घडविते. तुमचे या ग्रहाबरोबरचे नाते बदलते. मी या उड्डाणात सामील होतोय ही अशी एक बाब आहे जी आयुष्यात मला करायचीच होती. यात रोमांच आहे आणि माझ्यासाठी हे फार महत्वाचे आहे.’

या उड्डाणासाठी २० जुलै हा दिवस निवडण्यामागे याच दिवशी अमेरिकेच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिले पाउल टाकले होते असे कारण आहे. अपोलो ११ हे अंतराळयान २० जुलै रोजी चंद्रावर उतरले होते. बेजोस यांच्या स्पेस शिप साठी पायलटची आवश्यकता नाही. आणीबाणीची वेळ आली तर रॉकेट पासून कॅप्सूल वेगळी होईल आणि पॅराशूट उघडले नाही तरी पृथ्वीवर ती सुरक्षित उतरेल अश्या प्रकारे त्याचे डिझाईन केले गेले आहे. तरीही हा प्रवास १०० टक्के सुरक्षित नाही असे मत व्यक्त होत आहे.

बेजोस यांचा हा पहिला प्रवास ११ मिनिटांचा आहे. त्यात पृथ्वीच्या ६२ मैल वरून प्रवास होणार आहे. अंतराळ प्रवासासाठी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी अंतराळ यात्रा चार दिवसांची असणार आहे. यात तीन दिवसाचे प्री फ्लाईट ट्रेनिंग समविष्ट आहे अशी घोषणा यापूर्वीच केली गेली आहे.