पाकची ‘ मँगो डिप्लोमसी’ फेल, चीन अमेरिकेने नाकारली आंबे भेट

करोना मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान सरकारने आखलेल्या नव्या रणनीतीच्या पहिल्याच प्रयत्नांना ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान तर्फे त्याच्या अनेक मित्र देशांना गोड, मधुर आंबे भेट म्हणून पाठविले गेले आहेत. मात्र जवळचे मित्र मानल्या गेलेल्या अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी पाकिस्तानची ही गोड भेट करोना क्वारंटाइन नियमावर बोट ठेऊन नाकारली आहे. यामुळे पाकिस्तानच्या ‘मँगो डिप्लोमसी’ वर बोळा फिरला आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार पाकिस्तानने या वर्षी विविध प्रकारचे आंबे चीन, अमेरिकेसह ३२ देशप्रमुखाना भेट म्हणून पाठविले होते. विदेश मंत्रालयातर्फे ही भेट बुधवारी पाठविली गेली पण करोना विषाणू क्वारंटाईन नियम दाखवून चीन आणि अमेरिकेने हे आंबे स्वीकारण्यास नकार दिला. यावेळी पाकिस्तान तर्फे चौसा या जातीचे आंबे भेट म्हणून पाठविले गेले होते. पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरीफ अल्वी यांच्या तर्फे या भेटी रवाना केल्या गेल्या होत्या. ३२ देशांचे राष्ट्रपती, सरकार यांना आंबे पेट्या पाठविल्या गेल्या होत्या असे समजते.

इराण, खाडी देश, तुर्कस्थान, अमेरिका, अफगाणिस्थान, बांग्ला देश, रशिया या देशांनी ही भेट स्वीकारली नाही तसेच श्रीलंका, नेपाळ, कॅनडा इजिप्त देशांनीही करोना कारण देऊन हे आंबे स्वीकारले नाहीत असे समजते.