जगातील सर्वात मोठ्या कुटुंबप्रमुख जीओनाचे निधन

मिझोरम मध्ये आपल्या ३८ बायका, ८९ मुलांसह सुमारे २०० माणसे असलेल्या कुटुंबप्रमुख जीओना चाना यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी ट्विटर स्वतःच याची माहिती दिली असून जीओना यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ट्विट मध्ये मुख्यमंत्री म्हणतात, मिझोरम आणि बकटावंग तलंगनुम गावातील हा परिवार राज्य पर्यटनाचे मोठे आकर्षण बनले होते.

जीओना यांच्या परिवारात ३८ पत्नी, ८९ मुले आणि ३३ नातवंडे, पतवंडे, १४ सुना यांचा समावेश असून जगातील हे सर्वात मोठे कुटुंब आहे. वयाच्या १७ व्या वर्षी जीओना यांचा पहिला विवाह झाला होता. १०० खोल्या असलेल्या चार मजली इमारतीत या कुटुंबाचे वास्तव्य आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्य काही ना काही व्यापार करतो त्यामुळे या कुटुंबाची ओळख आत्मनिर्भर कुटुंब अशी आहे.

जीओना यांची पहिली पत्नी मुखिया म्हणून काम करते. घरातील कामांची वाटणी करणे आणि देखभाल हे तिचे काम आहे. घरातील अन्य महिला घरकाम आणि शेतीकाम करतात. कॉंग्रेसच्या गरीब समर्थक नवीन जमीन उपयोग योजनेचा या कुटुंबाने सर्वात चांगला उपयोग करून घेतला आहे. २०११ आणि २०१३ मध्ये रिप्ले च्या ‘बिलीव्ह ईट ऑर नॉट’ मध्ये या कुटुंबाला स्थान दिले गेले होते.