डास मलाच का चावतात?


ज्या भागात भरपूर डास आहेत अशा भागातल्या एखाद्या घरात पाच-सहा लोक गप्पा मारत बसले असता डास घोंगावायला लागतात. त्यातला एखादाच माणूस डासांच्या चावण्याने हैराण होतो. मात्र बाकीचे त्याचे मित्र बिलकूल अस्वस्थ होत नाहीत. या संबंधात थोडे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच डास जास्त चावतात आणि ही गोष्ट उघड झाल्यानंतर सगळे चेष्टा मस्करी करायला लागतात. ज्या एकट्याला डास चावतात त्याला प्रश्‍न पडतो की इतर चार-पाच जणांना सोडून डास आपल्यालाच का चावतात? अन्य लोक त्याला म्हणायला लागतात, तुमचे रक्त जास्त गोड असेल म्हणून डास तुम्हाला पसंत करत आहेत. यातली थट्टा मस्करी सोडली तरी शास्त्रज्ञांनी एक गोष्ट मान्य केली आहे की डास काही विशिष्ट लोकांनाच चावतात आणि काहींना चावत नाहीत ही गोष्ट खरी आहे.

असे एखादे निरीक्षण समोर आले की शास्त्रज्ञांच्या विचारांना चालना मिळते आणि ते हे डास एका विशिष्ट व्यक्तीला का चावतात यावर संशोधन करायला लागतात. अमेरिकेत डास नियंत्रक संघटना नावाची एक स्वतंत्र संघटना आहे आणि त्या संघटनेत अनेक संशोधक आहेत. त्यांनी आता या विषयावर संशोधन करायला सुरूवात केली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे हे विशेष असतात आणि एका व्यक्तीसारखे बोटाचे ठसे दुसर्‍या व्यक्तीकडे नसतात, असे म्हटले जाते. तीच गोष्ट घामालाही लागू आहे. या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक माणसाचा घाम वेगळ्या वासाचा आहे आणि एकाच्या घामासारखा वास दुसर्‍याच्या घामाला येत नाही. तिथेच डास एकाच माणसाला का चावतात याचे उत्तर मिळते.

ज्याच्या घामाचा वास डासाला आवडतो त्यांनाच ते चावतात आणि त्यांची ही निवड करण्याचे काम घामातील निरनिराळ्या ४०० द्रव्यांच्या मिश्रणावर अवलंबून असते. ही ४०० मूलद्रव्ये कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या घामात असतात आणि त्यांच्या त्या प्रमाणावर प्रत्येकाच्या घामाचा विशेष वास ठरलेला असतो. आपल्याला ज्याला चावायचे आहे त्याच्या घामाचा वास डासांना ५० मीटर अंतरावरून येतो. एवढे त्याचे घाणेंद्रिय तीव्र असते. दुसर्‍या एका मुद्यावरूनही ठरत असते ज्याचा रक्तगट ओ असणार्‍या व्यक्तींना डास जास्त चावतात आणि अ ग्रुप असणार्‍यांना कमी चावतात. कोणतीही व्यक्ती आपल्या रक्तगटावरून काही संदेश त्याच्या नकळत प्रारित करत असते आणि तोच डासांसाठी इशारा असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment