वारकरी सेनेची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू – यशोमती ठाकूर


अमरावती : कोरोना दक्षता निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी 10 मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. विदर्भातील अन्य पालख्यांनाही मर्यादित संख्येत जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वारकरी सेनेने केली आहे. त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे सांगितले. वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

विदर्भात 40 प्रमुख पालख्या आहेत. त्यांच्या प्रत्येकी किमान 10 वारक-यांना कोरोना दक्षता नियमांचे पालन करुन स्वतंत्र वाहनाद्वारे जाण्याची परवानगी मिळण्याची मागणी सेनेच्या पदाधिका-यांनी केली. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य मानून पालखी सोहळ्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. तथापि, सेनेच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आषाढी वारीसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांतील पालख्यांबाबत नियोजनासाठी दरवर्षी पालखी सोहळ्याच्या आधी विभागीय स्तरावर बैठक घेण्यात येईल, असा निर्णय यावेळी झाला.