घरातील नकारात्मक उर्जा घालविण्यासाठी…


घरामध्ये असताना कधी तरी वातावरण उदासीन असणे, कोणत्याही कामाचा उत्साह न वाटणे, घरामध्ये सतत काही ना काही कारणाने लहान मोठ्या कुरबुरी सुरु असणे, आयचे कारण घरामध्ये असणारी नकारात्मक उर्जा असू शकते. हे नकारात्मक उर्जा घरामधून हटविण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल.

घरामध्ये सतत हवा खेळती असायला हवी. यासाठी घरातील दारे खिडक्या सकाळच्या वेळी उघडून ठेवाव्या. घरामध्ये ताजी, खेळती हवा असल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. तसेच दररोज आपले अंथरूण –पांघरूण व्यवस्थित झटकून, काही काळ मोकळ्या हवेवर ठेवावे. जर हे करणे शक्य नसेल, तर झोपण्याच्या खोलीमधील पडदे आणि खिडक्या काही काळाकरिता उघडून बाहेरची ताजी हवा खोलीमध्ये खेळू द्यावी. तसेच घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी मंद सुवास पसरवावा. ज्यासाठी उदबत्ती, किवा एअर फ्रेशनर चा वापर करावा.

घरामध्ये जुन्या, न वापरता येण्याजोग्या, मोडक्या वस्तू साठवून ठेऊ नयेत. या वस्तूंच्या अडगळीमुळे घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होण्यामध्ये अडथळे येतात. सकारात्मक उर्जेचा संचार संपूर्ण घरामध्ये होण्यासाठी घरामधील अडगळ हटवावी. तसेच घरातील लहान मोठ्या वस्तूंचा पसारा आवरून ठेवण्याचा प्रयत्न करावा. घर आवरलेले असल्यामुळे स्वच्छ राहते आणि त्यामुळे घरातील वातावरण आणि घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची मने प्रसन्न राहण्यास मदत होते.

घरामधील रंगसंगती कशी आहे, यावर देखील घरामधील वातावरण अवलंबून असते. घरामध्ये रंगसंगती फार गडद नसावी. हलक्या रंगसंगतीने घर प्रशस्त आणि प्रसन्न वाटते. चायनीज वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ‘विंड चाइम्स’ किंवा लहान लहान घंटा टांगणे शुभ मानले जाते. यांच्या आवाजाने घरातील नकारात्मक उर्जा बाहेर पडते, व घराबाहेरील नकारात्मक उर्जा घरामध्ये शिरत नाही. याच साठी घरामध्ये एखादे विंड चाइम असावे.

Leave a Comment