१९८० साली स्वित्झर्लंड येथे काही मौल्यवान वस्तूंचा लिलाव होणार असल्याच्या वृत्ताने भारतामध्ये खळबळ उडवून दिली. याचे कारण म्हणजे, लिलाव होणार असलेल्या वस्तूंमध्ये मूळच्या भारतातील असलेल्या एका मौल्यवान सुवर्ण मुद्रेचा देखील समावेश होता. ही सुवर्णमुद्रा आजतागायत बनविल्या गेलेल्या सर्व सुवर्णमुद्रांमध्ये सर्वात मोठी असून, हिचे वजन तब्बल बारा किलो होते. मुघल सम्राट जहांगीरच्या काळामध्ये अश्या प्रकारच्या सुवर्णमुद्रा तयार करण्यात आल्या असल्याच्या ऐतहासिक नोंदी आहेत. तत्कालीन ऐतिहासिक नोंदींप्रमाणे, एक हजार मोहोरांचे मूल्य अंकित असलेली अशीच एक सुवर्णमुद्रा जहांगीर याने पर्शियन राजदूत झामील बेग याला नजर केली होती. पण यापिकी एक सुवर्णमुद्रा लीलावापर्यंत कशी येऊन पोहोचली याचा शोध घेणे मोठे अवघड काम ठरले.
ही आहे भारतातील सर्वात मोठी सुवर्णमुद्रा
मुघल साम्राज्य अतिशय वैभवशाली असून, तत्कालीन मुघल राज्यकर्त्यांकडे मौल्यवान रत्नांची, सोन्या-चांदीची अजिबात कमतरता नव्हती. त्याकाळी जगातील इतर साम्र्याज्यांचे वैभव मुघल साम्राज्याच्या वैभावापुढे फिके पडत असे. त्यामुळे मुघल साम्राज्यामध्ये सुवर्णमुद्रा इतक्या मोठ्या प्रमाणावर बनविल्या जाणे सहाजिकच होते. या सुवर्णमुद्रा निरनिरळ्या किंमतीच्या असत. एक हजार मुद्रा किंवा त्याही पेक्षा जास्त किंमत अंकित असलेल्या सुवर्णमुद्रा जहांगीर आणि शाहजहान यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बनविल्या जात असत.
जहांगीरच्या काळामध्ये या सुवर्णमुद्रांवर १००, २००, ५०० आणि १००० मोहोरांच्या किंमती अंकित असलेल्या मुद्रा बनविल्या जात असत. या पेक्षा कमी किंमत अंकित असलेल्या मुद्रा दैनंदिन व्यवहारांकरिता वापरल्या जात, तर मोठी किंमत अंकित असलेल्या मुद्रा, उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शासकीय किंवा सेनेतील अधिकाऱ्यांना भेट म्हणून दिल्या जात. ‘तुझ्क-ए-जहांगिरी’ या जहांगीरच्या आत्मचरित्रामध्ये, हजार मोहोरांचे मूल्य अंकित असलेली मुद्रा पर्शियन राजदूत झामील बेग याला भेट म्हणून दिली गेली असल्याचा उल्लेख सापडतो. ही सुवर्ण मुद्रा बारा किलो वजनाची असून, २१ सेंटीमिटर इतका या मुद्रेचा परीघ असल्याचे समजते.
जहांगीरच्या काळामध्ये बनविल्या गेलेल्या या सुवर्णमुद्रा काळच्या पडद्याआड गेल्या असल्याचे इतिहासकारांनी मान्य केले असतानाच, स्वित्झर्लंडमध्ये यातील एका सुवर्णमुद्रेचा लिलाव होणाऱ असल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली. या संदर्भात अधिक चौकशी केली असता, सर्व घटनाक्रम उलगडत गेला. ऐतिहसिक नोंदींच्या नुसार, अनेक सुवर्णमुद्रांपैकी एक सुवर्णमुद्रा, औरंगझेबाने नवाब गाझीउद्दिन खान सिद्दीकी बहादूर याला भेट म्हणून दिली होती. याचा पुत्र निझाम-उल-मुल्क याने असफ जहा साम्राज्याची पायाभरणी केली. पिढ्यानपिढ्या ही सुवर्णमुद्रा निझामाच्या वंशाजांकडे राहिली. आठव्या निजामांच्या आई राजकुमारी दुरुशेहवर यांनी ही सुवर्णमुद्रा आपल्याबरोबर लंडन येथे नेली. त्यापुढे ही सुवर्णमुद्रा नेमकी कोणाकडे होती याचे कोणतेही उल्लेख सापडत नाहीत. सध्या ही सुवर्णमुद्रा लिलावामध्ये दहा मिलियन डॉलर्सच्या किंमतीला विकली गेली असून, एका अनामिक व्यक्तीच्या संग्रही आहे.