शतकापूर्वी फ्लॉप, पण आता मात्र सुपरहिट


बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक क्षणी आपल्या आसपासच्या जगामध्ये काही ना काही परिवर्तन घडत असते. इतकेच कशाला पण बदलत्या काळाच्या ओघात आपली विचारसरणी सुद्धा किती बदली आहे ! पूर्वीच्या काळी अनुचित समजल्या जाणाऱ्या काही गोष्टी आज आपल्या जीवनामध्ये आपण अगदी सहजतेने स्वीकारल्या आहेत. अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ या, ज्या साधारण एका शतकापूर्वी अगदी निकृष्ट समजल्या जात असत, पण आजच्या काळामध्ये याच गोष्टी प्रतिष्ठेच्या समजल्या जातात.

झिंगा किंवा लॉब्स्टर हा समुद्री जीव आताशा मासेप्रेमींचा आवडता पदार्थ झाला आहे. लॉब्स्टरची तयार dish हॉटेलमध्ये खावयाची असल्यास त्याला भरपूर पैसे देखील मोजावे लागतात. किंवा घरी काही विशेष प्रसंगी झिंग्याच्या कालवणाचा बेत असतो. पण हेच लॉब्स्टर परदेशामध्ये एके काळी कवडीमोल असत. इतकेच नाही, तर लॉब्स्टर हे निर्धन लोकांचे खाणे समजले जात असे. पूर्वीच्या काळी झिंगे इतके मुबलक प्रमाणात मिळत असत, की झिंग्याचे ढीग च्या ढीग समुद्रातून वाहून किनाऱ्यापर्यंत येत असत असे सांगितले जाते. झिंगा मासा केवळ कैदी, गुलाम आणि शिकाऊ कारागिरांचे खाणे असे, कारण त्यांनाच ते परवडत असे. ही परिस्थिती बदलली ती रेल्वेच्या येण्यानंतर. रेल्वेच्या द्वारे मालाची वाहतूक आणि देवाण घेवाण सुरू झाली, आणि त्याचबरोबर अन्न डबाबंद ( canned फूड ) करून निर्यात करण्याचे तंत्रज्ञान ही अस्तित्वात आले. त्यानंतर मात्र झिंग्याचा भाव वधारला. झिंगा जसजसा लोकांच्या पसंतीस उतरू लागला, तसतशी त्याची मागणी वाढली. कालांतराने झिंगा हॉटेल्सच्या मेन्यूमधेही प्रवेश करता झाला.

शरीरावर टॅटू किंवा गोंदण असणे हे परदेशामध्ये एके काळी शरमेची गोष्ट समजली जात असे, कारण हे टॅटू केवळ कैद्यांच्या शरीरावर त्यांची ओळख म्हणून गोंदविले जात असत. पण कालांतराने पाशिमात्य देशांमध्ये टॅटू, साधारण १९६० च्या दशकामध्ये मोटारसायकलस्वरांच्या टोळ्यांमध्ये आणि हिप्पी लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. पण आम जनतेमध्ये टॅटू तितकेसे लोकप्रिय नव्हते. पण जगाने जसा विसाव्या शतकामध्ये प्रवेश केला, तसा लोकांचा दृष्टीकोन बदलला. आणि आता टॅटू चे वेड तरुणाईमध्ये इतके पसरले आहे, की निरनिराळे टॅटू अगदी संपूर्ण शरीरावर करून घेण्यासही लोक मागेपुढे पहात नाहीत. इतकेच कशाला, तर विदेशात आणि आपल्या देशातही टॅटू बनविणाऱ्या काही कलाकारांना आता सेलिब्रिटी स्टेटस मिळाले आहे.

आजकाल तरुणाई आणि वयस्क मंडळींमध्येही लोकप्रिय असलेली जीन्स जेव्हा अस्तित्वात आली, तेव्हा तिचे रूप वेगळे होते. जीन्सचा जनक लेवाय स्त्राउस हा मनुष्य एक लहान व्यापारी होता. १८५० साली तो बवेरीया मधून उत्तर अमेरिकेमध्ये आला. येताना त्याने स्वतःबरोबर कॅनव्हास चा कपडा आणि विकता येण्याजोग्या लहानसहान वस्तू आणल्या होत्या. त्या काळी खाणींमध्ये काम करणाऱ्या खाण कामगारांना, वापरण्यास चांगल्या दणकट कपड्याच्या पँट्स ची गरज असल्याचे लेवाय च्या लक्षात आले. तेव्हा एका शिंप्याच्या मदतीने त्याने खाण कामगारांसाठी कॅनव्हासच्या पँट्स बनविल्या. अतिशय दणकट आणि लवकर न फाटणाऱ्या या पँट्स खाण कामगारांच्या पसंतीला उतरल्या, आणि ‘जीन्स’ चा जन्म झाला. १९६० सालापर्यंत जीन्स कामगारवर्गाचा पोशाख होता. पण त्यानंतर काही सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये नायका-नायिकांसाठी जीन्स वापरली गेल्यानंतर मात्र जीन्स हे फॅशन स्टेटमेंट बनले आणि जीन्सने प्रसिद्धीचे शिखर गाठले. आता प्रत्येकाच्या कपड्यांच्या संग्रही एक तरी जीन्स हटकून असतेच.

परदेशामध्ये किंवा आपल्या देशातही आपल्या आहारामध्ये असलेला बटाटा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग कसा बनला, यामागेही मोठी रोचक गोष्ट आहे. १६व्या शतकामध्ये जेव्हा स्पॅनिश लोकांनी इंका साम्राज्यावर आपले वर्चस्व स्थापन केले, तेव्हा परत येताना त्यांनी आपल्या सोबत बटाटा आणला. पण ही भाजी फारशी लोकप्रिय नसल्यामुळे अगदी कमी प्रमाणात तिचे उत्पादन केले जात असे, आणि जनावरांचे खाद्य म्हणूनच केवळ बटाट्याचा वापर केला जात असे. पण हळूहळू बटाटा युरोपीय देशांमध्ये जाऊन पोहोचला. तरी ही बटाट्याविषयी लोकांच्या मनात भीती होती. काही लोकांनी तर बटाटे विषारी असून, ते खाल्ल्याने कुष्ठरोग होतो असे ही सांगण्यास सुरुवात केली. पण फ्रेंच सैन्याधिकारी अन्त्वान परामेंतीये याने हे सर्व गैसमज खोडून काढत बटाटा खाणे आरोग्यास हितकारक असल्याबद्दल प्रबंध लिहिला. त्यांनतर पुढील काही वर्षांमधेच बटाटा अतिशय लोकप्रिय झाला, आणि अश्या रीतीने, एक तर स्वस्त, आणि सहज उपलब्ध असणारी ही भाजी आपल्या आहाराचा हिस्सा होऊन गेली.

Leave a Comment