यामुळे ट्विटरवर ट्रेंड होत आहे #BoycottKareenaKhan हॅशटॅग


सध्या एका वेगळ्याच कारणामुळे लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान चर्चेत आहे. #BoycottKareenaKhan असा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे. या मागचे कारण म्हणजे करीना ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. पण आता नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केल्यामुळे ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे.

‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात ‘सीता’ या भूमिकेसाठी निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी करीना कपूर खानशी संपर्क साधल्याचे म्हटले जात होते. तिला या भूमिकेसाठी १२ कोटी रुपये मानधन म्हणून देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इतर चित्रपटांच्या तुलनेत हे मानधन जास्त असल्याचे म्हटले जात होते. या सर्व चर्चा सुरु असताना आता सोशल मीडियावर करीनाला ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी करीनाला बॉयकॉट करण्याची मागणी केल्यामुळे ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे.

‘स्पॉटबॉय’शी बोलताना चित्रपटाचे लेखक विजेंद्र प्रसाद यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. करीनाला चित्रपटाची ऑफर देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी या चित्रपटामध्ये अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण राम आणि सीतेची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले होते. पण या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.