ज्या शेतकऱ्याचे मोदींनी ‘मन की बात’मध्ये केले कौतुक त्यानेच केला काँग्रेसमध्ये प्रवेश


अकोला : आपल्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्याचे शेतकरी मुरलीधर राऊत यांचे भरभरून कौतुक केले होते. त्याच राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. शुक्रवारी ते अकोल्यात आले होते. त्यावेळी मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. बाळापूर तालुक्यातील पारस फाट्यावर हॉटेल मराठा नावाने त्यांचे हॉटेल आहे. 16 नोव्हेंबर 2016 च्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राऊत यांचे तोंडभरुन कौतुक केले होते.

राऊत यांनी नोटबंदीच्या काळात पैसे नसणाऱ्या अनेक लोकांना मदत केली होती. महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या हॉटेलमधून मोफत जेवण दिले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या कार्याची दखल घेतली होती. मुरलीधर राऊत यांच्याकडे आधी शेती होती. पण राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात जागा गेली होती. त्यातून त्यांना मोबदला मिळाला नसल्यामुळे त्यांनी जमीन गेलेल्या इतर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या आंदोलनाची दखल घेत मुद्दा उचलून धरला होता.

ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवला होती. शेळद गावचे ते सरपंच राहिले होते. त्यांनी आपल्या गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रम सुद्धा राबवला आहे. मुरलीधर राऊत यांनी मागील वर्षी कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या हॉटेलमध्ये अनेक मुलींची लग्न मोफत लावून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.