पैसे न देता घरी घेऊन जा Toyota ची अर्बन क्रूझर


मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये देशभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे वाहन कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत, आता बऱ्याच कार कंपन्या गेल्या महिन्यात झालेले नुकसान जूनमध्ये भरून काढण्याच्या योजना आखत आहेत. म्हणूनच विविध कंपन्या वेगवेगळ्या आणि उत्तम ऑफर देत आहेत. दरम्यान, एक उत्कृष्ट ऑफर टोयोटा कंपनीने सादर केली आहे, ज्यामध्ये आपण कंपनीची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही टोयोटा अर्बन क्रूझर पैसे न देता घरी आणू शकता.

या ऑफरचे “Buy Now and Pay Later” असे नाव आहे. म्हणजेच आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या. कंपनीने जरी अद्याप याबद्दल अधिक माहिती शेअर केलेली नाही, परंतु ही ऑफर फेसबुकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह झाली आहे. Cartoq ने दिलेल्या वृत्तानुसार, आत्ता ही कार घरी नेण्याची संधी टोयोटा ग्राहकांना देईल आणि ऑक्टोबर 2021 पासून त्याचे पेमेंट देता येईल. याचा अर्थ असा की, या ऑफर अंतर्गत ग्राहक ऑक्टोबरपर्यंत अर्बन क्रूझर एसयूव्हीचा आनंद घेऊ शकतात आणि चार महिन्यांत पैसे जमा करून पेमेंट करु शकतात. पण याखेरीज या ऑफरबद्दल अन्य कोणतीही माहिती समोर आली नाही.

अशा परिस्थितीत, जो ग्राहक लोनवर कार खरेदी करेल त्याला कर्जाचा हप्ता शेवटी भरावा लागेल. या प्रकारची ऑफर काही वर्षांपूर्वी भारतात स्कोडाने सादर केली होती. टोयोटा प्रथमच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशी ऑफर देत आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने ही एसयूव्ही भारतीय बाजारात सादर होती. ही एसयूव्ही मारुती सुझुकीच्या लोकप्रिय सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही विटारा ब्रेझावर आधारित आहे. यात 1.5 लीटर 4 सिलेंडर नॅचरली अॅस्पीरेटेड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे, जे 105bhp पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कनव्हर्टर गियरबॉक्ससह सुसज्ज आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

या कारचे मॅन्युअल व्हर्जन 17.03 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 18.76 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेमध्ये तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये मिड, हाय आणि प्रीमियमचा समावेश आहे. अर्बन क्रूझर एसयूव्ही, एंट्री-लेवल व्हेरिएंट मिड-ग्रेड एमटीची किंमत 8.40 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 11.50 लाख रुपये एवढी आहे.