संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार


अहमदनगर : कोल्हापूरमध्ये 16 तारखेला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पण भाजपचे खासदार संभाजीराजे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये या आंदोलनावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना मला कुणी काही शिकवण्याची गरज नसून, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

संभाजीराजे यांनी आज कोपर्डी येथे जाऊन निर्भयाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोपर्डी प्रकरणानंतर 58 मोर्चे निघाले होते. याची दखल संपूर्ण देशाने घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा अशी विनंती केली. गेली 4 वर्ष खटला न्यायलयात आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या राज्यात आपण राहत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, स्पेशल बेंच तयार करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली.

छत्रपती महाराजांचा मी वंशज असल्यामुळे मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. मी मराठा समाजाच्या लढ्यात २००७ पासून सहभागी आहे. हे कधी आंदोलनात आले, हे मला माहिती नाही. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जर काही सल्ला दिला तर मी त्यावेळी बोलेन, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला.

तसेच, त्यांना सकाळपासून संभाजीराजे दिसत आहे. सकाळी ज्या प्रकारे आरती लावतो तसे चंद्रकांत पाटलांचे झाले आहे. त्यांच्या मनात असे का येत आहे हे मला माहिती नाही. मी ज्योतिषी नसल्यामुळे तेच याबद्दल सांगू शकतील. शिवरायांनीही कधी ज्योतिषींना मानले नव्हते. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचा असा सणसणीत टोलाही संभाजीराजेंनी पाटलांना लगावला.

तर दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना पुन्हा एकदा संभाजीराजेंवर निशाणा साधला होता. मोर्चाची घोषणा संभाजीराजे यांनी केली होती. हे प्रसारमाधम्यांनी दाखवले, वृत्तपत्रात आले आहे. जर हे खोटे असेल तर त्यांनी प्रसारमाध्यमांवर खटला दाखल करावा, त्यांना वकिल लागले तर मी देण्यास तयार असल्याचा टोला पाटील यांनी लगावला होता. तसेच, संभाजीराजे हे भाजपचे खासदार असल्याचे मान्य करत नसले तरीही ते ऑन पेपर भाजपचे खासदार असल्याची आठवणच पाटील यांनी करून दिली होती.