मुंबईसह उपनगरामध्ये वीजांच्या कडकडाटसह पावसाची दमदार बॅटिंग


मुंबई – मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी चालवणं अवघड होत आहे.

तसेच मुंबईतील हिंदमाता परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठण्यास सुरवात झाली आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि पाऊस यामुळे दृश्यमानता देखील कमी झाली आहे. सध्या महापालिका कर्मचारी साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत.

गेल्या तासाभरापासून मुंबई पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, या सर्वच विभागांमध्ये आता रस्त्यांवर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चेंबूरचा टिळकनगर कॉलनी विभाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सगळे रस्ते तीन ते चार फूट पाण्यामध्ये गेलेले आहेत.

पावसाने मुंबईसह उपनगरामध्ये दमदार हजेरी लावली असून वीजांचा कडकडाटही सुरु आहे. दरम्यान हवामान खात्याकडून दुपारी समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी दुपारी हायटाईडच्या वेळी 1.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात 4.32 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.