मुख्याधिकारी, ठेकेदारास भाजप नगरसेविकेकडून जीवे मारण्याची धमकी!


सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांची सत्ता असलेल्या सातारा नगरपालिकेतील बांधकाम सभापतींनी वेळेत कामे होत नसल्यामुळे मुख्याधिकारी व ठेकेदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगर पालिका प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी सूचना खासदार उदयनराजे यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना केली आहे.

भाजप नगरसेविका आणि सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी प्रभागात कामे होत नसल्यामुळे मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांना अपशब्द वापरत गळा चिरून टाकेन असे वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली आहे. साताऱ्यात सध्या त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल होत आहे.

सिद्धी पवार यावर बोलताना म्हणाल्या की, एक सातारकर म्हणून हा माझ्या भावनांचा उद्रेक आहे. लोकांची विकासकामे होत नसल्यामुळे मला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने माझा संताप अनावरण झाला असून, लोकांच्या भावनांचा उद्रेक झालेला असल्यामुळे, मला माझ्या वक्तव्याचा अजिबात खेद नाही. सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती आणि भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरून ठेकेदाराच्या कामगारास फोनकरून चांगले फैलावर घेतले. तसेच, सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना शिवीगाळ केल्याच्या ऑडिओक्लिपची सध्या साताऱ्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

खासदार उदयनराजे या प्रकाराबाबत बोलताना म्हणाले की, प्रत्येकाने जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. काम करत असताना अडचणी निर्माण होत असतात, पण यामुळे समतोल बिघडता कामा नये. ऑडिओ क्लिप कशामुळे झाली मला माहिती नाही, पण ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून अशी वक्तव्य करणे मला अनपेक्षित आहे. तसेच, उदयनराजे यांनी नगर पालिकेच्या चाललेल्या कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. या क्‍लिपची गंभीर दखल घेत त्यांनी विकास कामांत अडथळा ‍आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनाला दिल्‍या आहेत.

कोणाला शिवीगाळ करणे, अर्वाच्‍च भाषेत दम देणे, जीवे मारण्‍याची धमकी देणे चुकीचे आहे. कोणत्‍याही पक्षाचा नगरसेवक असू द्यात. पण, असे प्रकार चुकीचे आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्‍यास विकासकामे रखडतील. यामुळे मी अभिजीत बापट यांना अशा कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्‍हा नोंद करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

दरम्यान भाजप नगरसेविका आणि सातारा नगरपालिकेच्या सभापती सिद्धी पवार यांनी आपण केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी सातारकरांच्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या असून स्थानिक नागरिकांना सुरू असणाऱ्या कामाचा प्रचंड त्रास होत आहे. माझे ते संभाषण एक तारखेचे आहे. ते व्‍हायरल केल्‍यामुळे नागरिकांना माझ्‍या कामाची पध्‍दत आणि त्‍यांच्‍याविषयी असणारा कळवळा दिसून येतो. क्‍लिप व्‍हायरल करणाऱ्यांचे मी आभार मानते आणि लोकहितासाठी कितीही गुन्‍हे दाखल झाले तरी त्‍याचा काहीही फरक पडणार नाही. जे मी बोलले ते भावनेच्‍या भरात आणि नागरिकांच्‍या प्रेमापोटी बोलले आहे. माझी भाषा आक्रमक आहे आणि ती मला मान्‍य आहे.

तसेच, मला कामाबाबत लोक विचारतात. माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करायला नेत्‍यांनी सांगितले आहे. मी त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द मानते. माझे बोलणे गुन्‍हा असेल तर काम चार वर्षे रखडवले त्‍यांच्‍यावर का गुन्‍हा दाखल होत नाही? कशाची वाट बघत आहात? असा सवालही सिद्धी पवार यांनी यावेळी उपस्‍थित केला. मी मुग गिळून गप्‍प बसणार नाही, नागरिकांच्‍या प्रश्‍नांवर मी बोलणारच, असेही सिद्धी पवार यांनी स्पष्ट केले.