या बर्गरचा आस्वाद घ्यायचा आहे? मग आधी ग्लोव्हज आणि गॉगल्स चढवा


आपण अनेकदा अनेक पद्धतीचे बर्गर चाखले असतील. लहान मुलांचे आणि आजकालच्या तरुणाईचे तर हे विशेष आवडीचे खाद्य आहे. अनेक तऱ्हेचे चविष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पर्याय उपलब्ध असणारा हा बर्गर सर्वांना पसंत पडेल असे फास्ट फूड आहे. मात्र बर्गर खाताच डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागतील आणि तोंड भाजून निघेल, तसेच हा बर्गर हातामध्ये धरल्याने हातांच्या बोटांची प्रचंड आगही होईल, असा बर्गर मात्र आपण कधीच खाल्ला नसेल.


ऑस्ट्रेलिया येथील ‘बर्गर अर्ज’ या ठिकाणी मिळणारा बर्गर हा इतका तिखट आणि गरम असतो, की हा बर्गर खाण्याआधी बर्गर-शौकिनांना हाताच्या बोटांच्या संरक्षणार्थ ग्लोव्हज आणि डोळ्यांवर चष्मा चढविण्याचा सल्ला देण्यात येतो. अश्या या भयंकर तिखट बर्गरचे नाव ‘डबल डेकर डेथ विश’ असे असून, हा बर्गर खाण्यापूर्वी ग्लोव्हज आणि गॉगल्स घालावे लागतातच, पण त्याशिवाय हा बर्गर खाण्यापूर्वी ‘सेफ्टी फॉर्म’ भरणेही ग्राहकांसाठी बंधनकारक असते. या फॉर्मवर सही करताना, बर्गर आपण स्वतःच्या जबाबदारीवर खात असून, याने झालेल्या कोणत्याही प्रकारच्या त्रासाला रेस्टॉरंट जबाबदार नसून, बर्गर खाणारा जबाबदार असल्याचे, सर्व ग्राहक आपल्या सहीनिशी लिहून देत असतात.


हा बर्गर, घोस्ट बर्गर सॉस, त्रिनिदाद स्कॉर्पियन, पिकल्ड हॅलपिनो आणि अतिशय तिखट समजल्या जाणाऱ्या हबानेरो मिरच्यांचा वापर करून तयार करण्यात येतो. या रेस्टॉरंटमध्ये दर दिवशी पन्नास ‘डबल डेकर डेथ विश’ हे बर्गर विकले जातात. हा बर्गर खाऊन पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांतून हमखास पाणी पाझरू लागते. पण तरीही हा बर्गर खाऊन पाहण्यासाठी लोक येथे आवर्जून येत असतात.

Leave a Comment