कोविन अॅपमधून डेटा लीक होत असल्याचे सर्व दावे खोटे आणि निराधार – केंद्रीय आरोग्य मंत्रालय


नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी तयार केलेले CoWin हे डिजिटल व्यासपीठ हॅक करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. याची दखल घेऊन संबंधित सर्व दावे खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.

सोशल मीडियात कोविन अॅपमधून डेटा लीक होत असल्याची माहिती व्हायरल झाली असून याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशनने (EGVAC) याबाबत एक पत्रक जारी करुन सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

डार्क वेबवर CoWIN सिस्टमची माहिती लीक करण्यात आल्याचा दावा पूर्णपणे खोटा असून याचा पूर्णपणे तपास आरोग्य मंत्रालय आणि एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन केला आहे. CoWIN मधून कोणताही डेटा लीक झालेला नसल्याचे ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. याउलट २४ तास कोविनच्या तांत्रिक प्रणालीवर नजर ठेवली जात असून सातत्याने कोविनच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेतली जात असते. जेणेकरुन प्रत्येक युझरचा डेटा सुरक्षित राहू शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्राद्योगिकी मंत्रालयाने CoWIN सिस्टमच्या कथिक हॅक होण्याच्या वृत्ताची दखल घेऊन कॉम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून याची तपासणी करण्यात आली. यात CoWIN पूर्णपणे सुरक्षित असल्याचे निदर्शनास आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

CoWIN सिस्टम हॅक होणे आणि डेटा लीकवरुन डार्क वेबवर अस्तित्वात असलेल्या कथित हॅकर्सचे दावे आधारहीन असून कोविनच्या सुरक्षेबाबत आम्ही सातत्याने काळजी घेत असल्याचे एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशनचे चेअरमन डॉ. आर.एस.शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमांमध्ये ९ जून रोजी CoWIN सिस्टमचा डेटा लीक झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. यात युझरचा फोन नंबर, नाव, इमेल इत्यादी माहिती लीग झाल्याचे सांगण्यात येत होते.