भाजप प्रवेशावर सचिन पायलट यांची प्रतिक्रिया; त्यांच्यात माझ्याशी बोलण्याची धमक नाही


नवी दिल्ली – दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला असून काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करत भाजपमध्ये प्रवेश केला. पण, त्यांच्यापाठोपाठ सचिन पायलट देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

सचिन पायलट नाराज असल्याच्या काही दिवसांपूर्वी चर्चा होत्या. पत्रकार परिषदांमधून त्यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चामुळे काँग्रेस नेते सचिन पायलट चांगलेच संतापले आहेत. पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारताच पायलट यांनी त्यांच्यात मला भेटण्याची हिंमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधींच्या टीममधला तरुण चेहरा म्हणून सचिन पायलट हे पक्षात ओळखले जातात. पण, एकीकडे त्यांच्या नाराजीच्या चर्चा आणि दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधियांपाठोपाठ जितिन प्रसाद यांनी देखील भाजपचा रस्ता धरल्यामुळे ते देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तशा प्रकारची विधाने भाजपच्या काही नेत्यांकडून देखील केली गेली. यामध्ये भाजप नेत्या रिटा बहुगुणा यांनी देखील नुकतेच त्यासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर सचिन पायलट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आपले सचिनशी बोलणे झाले आहे, असे रिटा बहुगुणा जोशी म्हणाल्या आहेत. पण कदाचित त्यांचे सचिन तेंडुलकरसोबत बोलणे झालं असेल. माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात हिंमत नसल्याचे सचिन पायलट म्हणाले आहेत.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिटा बहुगुणा यांनी सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. जितिन प्रसाद यांच्याप्रमाणेच सचिन देखील लवकरच भाजपमध्ये दाखल होणार आहे. काँग्रेस पक्षामध्ये त्यांना चुकीची वागणूक मिळत असल्याचे रिटा बहुगुणा म्हणाल्या होत्या. त्यावरच सचिन पायलट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.