साताऱ्यात होणाऱ्या दोन राजेंच्या भेटीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष


सातारा : खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणावरुन आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे उदयनराजेंची भेट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे नेमकी ही भेट कधी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वत: उदयनराजे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गुरुवारी कोल्हापुरात १६ जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन करणार असल्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केल्यानंतर आज पुणे किंवा साताऱ्यात संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यात भेट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आज ही भेट झालेली नसून ही भेट येत्या तीन ते चार दिवसांत होणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितले आहे.

अगोरदच काही भेटीगाठी माझ्या ठरल्या होत्या. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ अधिकाऱ्यांसोबत रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी आज महत्वाची बैठक आहे. माझ्या पूर्वनियोजित भेटी असल्यामुळे आमची आज भेट होऊ शकणार नसल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले.

ते माझे बंधू आहेत. तुमचे घर आहे, तुम्हीही कधीही येऊ शकता, असे मी त्यांना सांगितले आहे. मी त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्यासमवेत आहे. आम्ही भेटणार आहे. फक्त दोन तीन दिवसांतील पूर्वनियोजित भेटीगाठी संपल्या की आम्ही भेटू. त्यावेळी चर्चेतून काहीतरी चांगले घडेल, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.