दिल्ली सरकारच्या ‘घर घर राशन’ योजनेवरुन भाजपचा गंभीर आरोप!


नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या महत्वकांक्षी ‘घर घर राशन’ योजनेवरून भाजप विरुद्ध केजरीवाल सरकार असा पुन्हा एकदा वाद सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील आज या मुद्यावरून केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीतील नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात अयशसस्वी ठरलेले अरविंद केजरीवाल आता प्रत्येक घरी धान्य पोहचवण्याबाबत बोलत आहेत. रेशन माफियांच्या नियंत्रणाखाली दिल्ली सरकार असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

तसेच, पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, प्रत्येक घरी धान्य असे अरविंद केजरीवाल म्हणत आहेत. पण ज्यांना ऑक्सिजन पुरवठा करता आला नाही, मोहल्ला क्लिनिकमधून औषधी पोहचवता आल्या नाहीत. घर घर राशन हा देखील एक घोटाळा आहे. रेशन माफियांच्या नियंत्रणात दिल्ली सरकार आहे. देशभरात २ रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ भारत सरकार देत आहे. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील नोव्हेंबरपर्यंत गरिबांना मोफत रेशन दिले जाणार आहे.

तांदळाचा खर्च ३७ रुपये रुपये प्रतिकिलो येतो आणि गव्हाचा २७ रुपये प्रतिकिलो येतो. भारत सरकार सबसिडी देऊन राज्यांना रेशन दुकानांच्या माध्यमातून वितरीत करण्यासाठी धान्य देते. भारत सरकार यासाठी वर्षाकाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च करते, अशी देखील रविशंकर प्रसाद यांनी माहिती दिली.

याचबरोबर यावेळी केंद्र सरकारच्या वन नेशन वन राशन या योजनेचा उल्लेख करून दिल्ली सरकारवर टीका करताना रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, वन नेशन, वन रेशन कार्ड भारत सरकारद्वारे अत्यंत महत्वपूर्ण योजना सुरू करणयात आली आहे. वन नेशन, वन रेशन कार्ड योजना देशातील ३४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत यावर २८ कोटी पोर्टेबल टांजेक्शन झाले आहेत. केवळ केंद्रशासित राज्य दिल्ली आणि पश्चिम बंगाल व आसाम सोडून ही योजना प्रत्येक ठिकाणी लागू असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.