देशासाठी दिलासादायक बाब; सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण


नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात नियंत्रणाबाहेर जात असणारी परिस्थती मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग चौथ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या 24 तासात देशात 3403 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, 91702 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 1 लाख 34 हजार 580 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली आहे. म्हणजेच मागच्या दिवसभरात 46281 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. याआधी बुधवारी देशात 94052 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

देशात सलग 29 व्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा या संसर्गातून मुक्त होणाऱ्यांचा आकडा कमी आहे, ही देशासाठी दिलासादायक बाब असून येत्या काळात कोरोना नियमांचे पालन अगदी काटेकोरपणे झाल्यास हा आकडा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव निश्चितच आटोक्यात येईल असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

देशातील लसीकरणाच्या बाबतीतही सध्या चांगले चित्र दिसत आहे. 10 जूनपर्यंत देशात 24 कोटी 60 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या दिवसभरात देशात 32 लाख 74 हजार लसी देण्यात आल्या. लसीकरणाला वेग देण्यासोबतच देशातील आरोग्य यंत्रणांकडून कोरोना चाचण्यांनाही प्राधान्य देण्यात येत आहे.

महाराष्ट्रातही हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.