‘फॅट पीपल ऑन रेंट’, नवी जपानी सुविधा

जपान मध्ये अभावानेच आढळणाऱ्या जाड किंवा वजनदार व्यक्ती आता घरबसल्या पैसे कमाई करू शकणार आहेत. जगभरात जाड लोक बहुतेकवेळा हेटाळणी, चेष्टेचा विषय बनलेले दिसतात. जपान सुद्धा त्याला अपवाद नाही. अश्या लोकांना मानाचे जिणे जगता यावे आणि त्यांचा आत्मविश्वास कायम राहावा यासाठी असे जाडे लोक भाड्याने घेण्याची सुविधा जपान मध्ये उपलब्ध झाली असून या अनोख्या सेवेची जोरदार चर्चा होत आहे. ‘फॅट पीपल ऑन रेंट’ असे या सेवेचे नाव आहे.

जपान मध्ये ‘पीपल ऑन रेंट’ ही सुविधा नवी नाही. विशेष म्हणजे अनेक नागरिक या सुविधेचा लाभ घेतात. जपान मध्ये अनेक कारणांनी लोक रेंटवर घेतले जातात. गर्ल फ्रेंडला हेवा वाटावा म्हणून, फसवणूक करणाऱ्या पार्टनरला धडा शिकविण्यासाठी, आजी आजोबाचा सहवास मुलांना मिळावा म्हणून अशी अनेक कारणे यासाठी आहेत.

‘डेबुकारी’ नावाने नव्याने सुरु झालेल्या या सेवेची कल्पना मि. ब्लिस यांची असून त्यांनी ही सेवा एप्रिल मध्ये सुरु केली आहे. यात नोंदणीसाठी किमान १०० किलो वजन असणे आवश्यक आहे. प्रश्न असा येतो की जाड लोकांची कोणती सेवा लोकांना उपयुक्त आहे? तर ब्लिस सांगतात, प्लस साईज कपडे उत्पादक, डायट प्लान व्यावसायिक, डायट फूड उत्पादक अश्या सेवा देणाऱ्यांना जाहिराती साठी सुद्धा वजनदार माणसांचा वापर करून घेता येतो. साईट वरून वजनदार लोकांना हायर करणाऱ्याला तासाला २ हजार येन म्हणजे १३०० रुपये या लोकांना द्यावे लागतील. टोक्यो, ओसाका, आईची येथे यासाठी नोंदणी सुरु आहे. वजनदार लोकांच्या टॅलंटचा वापर गरजू करून घेतील शिवाय या लोकांना जाडी मुळे हरविलेला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान परत मिळू शकेल.