जो बायडेननी बोरीस जॉन्सनना गिफ्ट केली बाईक, बदल्यात मिळाली फोटो फ्रेम

अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन त्यांच्या पहिल्या वहिल्या परदेश दौऱ्यावर ब्रिटन येथे पोहोचले असून जी सात देश नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. गुरुवारी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बोरीस यांना अमेरिकेत बनलेली एक खास बाईक हेल्मेट सह भेट म्हणून दिली आहे. बोरीस यांच्या पत्नीला रेशमी ओढणी, आणि लेदरची पर्स फर्स्ट लेडीने गिफ्ट म्हणून दिली.

विशेष म्हणजे बोरीस यांनीही बायडेन यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे. हे गिफ्ट म्हणजे फ्रेडरिक डग्लस यांचा फोटो असलेली एक फ्रेम आहे. फ्रेडरिक अमेरिकी समाजसुधारक, वक्ता, लेखक आणि राजकीय नेते होते. आणि अश्वेत भेदभाव विरुध्द त्यांनी आवाज उठविला होता. बोरीस यांनी दिलेल्या रिटर्न गिफ्टचे अनेक अर्थ काढले जात आहेत. अमेरिकेत गेल्या वर्षी अश्वेत भेदभाव विरोध म्हणून निदर्शने केली गेली होती या दृष्टीने सुद्धा हे गिफ्ट चर्चेचे ठरले आहे.

येत्या रविवारी जो बायडेन ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेणार असून ही भेट राणीच्या निवासस्थानी होणार आहे. यावेळी सेना गार्ड सलामी दिली जाणार असून अमेरिकेचे राष्ट्रगीत वाजविले जाणार आहे. बायडेन महाराणी सोबत चहापान करणार आहेत. बायडेन आठ दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आले आहेत.