नायजेरियन सरकारचे ‘ट्विटर’ नो, ‘कु’ येस

नायजेरिया सरकारने गेल्या आठवड्यात मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी घातल्याची बातमी अजून ताजी असतानाच भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कु’ वर अधिकृत अकौंट उघडल्याची बातमी गुरुवारी आली आहे. विशेष म्हणजे कु चे सहसंस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी ट्विटरवर या संदर्भात पोस्ट टाकली आहे.

ट्विटरवर या संदर्भात पोस्ट टाकताना अप्रमेय म्हणतात,’ कु इंडियावर नायजेरियन सरकारच्या हँडलचे स्वागत. आता भारताबाहेर ही आम्ही पंख फैलावतो आहोत.’ गेल्या आठवड्यात नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांचे एक ट्विट ट्विटरने हटविले होते. त्यानंतर या देशाने ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.

भारतीय कु मायक्रोब्लॉगिंगची सुरवात गतवर्षी अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावत यांनी केली असून अनेक भारतीय भाषा त्यावर उपलब्ध आहेत. २०२० ऑगस्ट मध्ये ‘आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंज’ कु ने जिंकले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मध्ये देशवासियांना कु चा वापर करण्यास प्रोत्साहन दिले होते. तेव्हापासून कु चर्चेत आले आहे.