मुंबई – पुणे जिल्ह्यातील उरवडे (ता. मुळशी) येथील रासायनिक कंपनीतील स्फोट आणि आगीतील मृत्यूप्रकरणी औद्योगिक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घेण्यात यावा. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तत्काळ मिळावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
उरवडे रासायनिक कंपनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत पोहोचवा – उद्धव ठाकरे
उरवडेतील या रासायनिक कंपनीतील दुर्घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीनेही सर्वंकष चौकशीनंतर तातडीने अहवाल सादर करावा. मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबतही प्रशासनाने कार्यवाही करून, लवकरात लवकर सबंधितांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे.
तसेच औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांबाबत औद्योगिक सुरक्षा मानकांचा वारंवार आढावा घेण्यात यावा. सुरक्षा उपाययोजनांबाबत, तसेच नियमांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योंगावर कारवाई करण्यात यावी. सुरक्षा उपाययोजनांतील त्रुटींमुळे जीवितहानी होऊ नये याबाबत कठोरपणे पावले उचलण्यात यावीत, असेही निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.