भाजपला मिळालेले यश केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच; हे कोणीही नाकारू शकत नाही


नाशिक : नरेंद्र मोदी हे देशाचे आणि भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आहेत, असा माझा विश्वास असून भारतीय जनता पक्षाला गेल्या सात वर्षात जे काही यश मिळाले ते केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच असल्याचे हे कोणीही नाकारू शकत नसल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे नेते आहेत. ज्या पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाला वाटते की प्रत्येक निवडणुकीला त्यांचा चेहरा वापरला पाहिजे. पंतप्रधानांच्या नावावर प्रत्येक निवडणूक जिंकावी. त्यांच्या आधी सगळीकडे अटलबिहारी वाजपेयी यांचाही फोटो वापरला जायचा. एखादा नेता लोकांच्या मनात असेल तर ते कुणालाही पुसता येत नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. आज चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांनी वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावे. कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत, विशेष लहान मुलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांकडे पाहावे. चंद्रकांत पाटील अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आणि निष्कपट आहेत. लहान मुले कशी बडबड करतात तसा आनंद घ्यायचा असतो, असा शब्दात फिरकी घेत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्या आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही, या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, शिवसेना काय आहे, कोण वाघ आहे हे देशाने पाहिले आहे. या वाघांची जातकुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून कळतेच. तुम्हा सगळ्यांना या वाघाने खेळवले आणि लोळवले सुद्धा असल्याचे राऊत म्हणाले.