उच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका, रिलीज होणार बायोपिक


संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती. सुशांतच्या आत्यहत्येमुळे बॉलिवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक घडामोडी समोर आल्या. अशातच आता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी सुशांतच्या बायोपिकविरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात सुशांतच्या वडिलांनी एक याचिका दाखल केली होती. त्यात सुशांतच्या जीवनावर आधारित किंवा त्याच्या जीवनाशी साधर्म्य असलेल्या विविध प्रस्तावित चित्रपटांवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. पण सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी फेटाळली आहे.

अनेक तर्क-वितर्क सुशांत सिंहच्या आत्महत्येवरुन लढवले जात असून अनेकजण वेगवेगळ्या कथा रचत आहेत. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या प्रतिमेला तडा जात असल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिग्दर्शक दिलीप आणि निर्मात्या सरला सराओगी यांना न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत चित्रपट रिलीज न करण्याचे आदेश दिले होते. पण आता न्यायालयाच्या निर्णयामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.