कोव्हिशिल्ड लसीमुळे नाशिकमधील व्यक्तीच्या शरीरात निर्माण झाले चुंबकत्व; तज्ज्ञांनी दावा फेटाळला


नाशिक : नाशिकमधील एका 71 वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार समोर आला असून सध्या महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

9 मार्च रोजी जुन्या सिडको परिसरात राहणाऱ्या अरविंद सोनार यांनी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात 2 जूनला कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता. लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, असे अरविंद सोनार यांनी सांगितले. त्यानंतर काल (9 जून) त्यांच्या मुलाने इंटरनेटवर लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचे एक प्रकार बघितला. यावेळी आपल्या वडिलांमध्ये देखील चुंबकत्व संचारत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने तो प्रयोग आपल्या वडिलांवर केला. त्याने सुरुवातीला लोखंडाचा पत्रा लावून पाहिला, तो आकर्षित झाला. मग नाणी लावली, त्यानंतर स्टीलच्या वस्तू लावल्या आणि त्या चिकटल्या, असे अरविंद सोनार यांनी सांगितले. यानंतर त्यांनी खासगी डॉक्टरांशी संपर्क साधला असता याबाबत सांगता येणार नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले.

दहा वर्षांपूर्वी सोनार यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली असून त्यांना मधुमेहाचाही आजार आहे. कशामुळे हा सर्व प्रकार झाला असावा ही जाणून घ्यायची सोनार यांची देखील इच्छा आहे. माझी तपासणी करुन घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु हा अजब प्रकार सोशल मीडियात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान राज्याच्या कोवड-19 कृतीदलाचे सदस्य तात्याराव लहाने यांनी लसीचा आणि शरीराला स्टीलचा वस्तू चिकटण्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोव्हिशिल्ड लसीचे आपण अनेकांना डोस दिले आहेत. त्यांच्या शरीराला स्टील चिकटत असले तरी त्याचा आणि लसीचा कोणताही संबंध नाही. तसेच या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यांच्या शरीराला स्टील तसेच लोखंड चिकटते. त्यांच्या त्वचेला काहीतरी असावे, नाशिकमध्ये त्यांची तपासणी करायला हवी. परंतु याचा आणि लसीचा संबंध लावणे योग्य नाही. कारण लसीमुळे असे काही घडत नाही.