या देशात बीटकॉइनला मिळाली पहिली कायदेशीर मान्यता

मध्य अमेरिकेतील अल साल्वाडोर या देशाने जगात सर्वप्रथम आभासी चलन बीटकॉइन ला कायदेशीर मान्यता देऊन अशी मान्यता देणारा जगातील पहिला देश बनण्याचा मान मिळविला आहे. या देशाच्या कॉंग्रेसने ९ जून रोजी जगातील सर्वात बडी क्रिप्टो करन्सी (आभासी चलन)ला मान्यता देण्यासंदर्भात मांडल्या गेलेल्या विधेयकाला मान्यता दिली. त्यामुळे आता या देशात त्यांच्या अधिकृत चलन अमेरिकी डॉलर प्रमाणे बीटकॉइनचा वापर करण्याची मुभा असेल. बीटकॉइन वैध ठरविणारा हा कायदा ९० दिवसात लागू होईल असे समजते.

देशाचे राष्ट्रपती नायीब बुकेले या संदर्भात बोलताना म्हणाले बीटकॉइनला अधिकृत मान्यता दिल्याने परदेशी राहणाऱ्या देशाच्या नागरिकांना घरी पैसे पाठविणे सुलभ होणार आहे. आपल्या ट्विट मध्ये बुकेले म्हणतात, बीटकॉइनला मान्यता दिल्याने देशात गुंतवणूक वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि आर्थिक विकास होण्यास हातभार लागेल. शिवाय देशाच्या नागरिकांना वित्तीय सेवा खुल्या होतील.

जागतिक बँकेच्या २०१९ च्या आकडेवारीनुसार विदेशात राहणाऱ्या अल साल्वाडोरच्या नागरिकांनी या काळात ६ अब्ज डॉलर्स मायदेशी पाठविले आहेत. २००९ मध्ये बीटकॉइन जगासमोर सादर केले गेले. ओपन सोर्स प्रोटोकॉलवर ते आधारित असून कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणाद्वारे ते जारी होत नाही. बीटकॉइन सातोशी नाकामोतो या जपानी माणसाने सुरु केल्याचे सांगितले जाते मात्र नाकामोतो बद्दल काहीही माहिती उपलब्ध नसल्याचेही समजते.