जगात प्रथम २ वर्षाच्या मुलावर कानपूर मध्ये होणार करोना लस चाचणी

करोना लसीकरण लहान मुलांना करण्यासाठी ज्या चाचण्या सुरु आहेत त्यात २ ते ६ वयोगटातील लस चाचणी मध्ये दोन वर्षाच्या मुलावर कानपूर येथे चाचणी केली जाणार आहे. जगात अजून कुठल्याच देशात दोन वर्षाच्या मुलावर करोना लस चाचणी केली गेलेली नाही असे समजते. त्यामुळे कानपूर येथे होणारी चाचणी जगातील पहिलीच चाचणी असणार आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या देशात सुरु झाल्या आहेत. याच लसीची चाचणी दोन वर्षाच्या मुलावर होणार आहे.

सुरवातीला १२ ते १८ आणि ६ ते १२ या वयोगटावर चाचण्या करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले होते. भारत बायोटेकचा करोना वरील नेझल स्प्रे पुढील महिन्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान कानपूरच्या प्रखर हॉस्पिटल मध्ये मुलांवर मंगळावर पासून करोना लस चाचणी सुरु झाली आहे.

यात पहिल्या दिवशी १२ ते १८ वयोगटातील ४० मुलांचे स्क्रीनिंग करून त्यातील फिट ठरलेल्या २० मुलांना करोना लस दिली गेली. त्यानंतर बुधवारी ६ ते १२ वयोगटात १० पैकी पाच मुलांना लस दिली गेली. लस चाचणी प्रमुख इन्व्हेस्टिगेटर वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉ. व्ही. एन त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षाच्या मुलावर येथे जगातील पहिलीच चाचणी होत असून त्यानंतर अनेक लस उत्पादक त्यांच्या लसीच्या चाचण्या घेण्यासाठी योजना बनवीत आहेत. भारत बायोटेकचा नेझल स्प्रे गेम चेंजर ठरू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.