अशा प्रकारे सुधारा कोरोना लसीकरण प्रमाणपत्रातील चुका


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. सरकारने लसीकरणाची नोंद करण्यासाठी CoWIN, आरोग्य सेतू व इतर ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करुन दिली आहेत. नागरिकांना लसीकरणानंतर एक प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पण या प्रमाणपत्रात नाव, जन्म तारीख, वर्ष किंवा लिंग यासारख्या अनेक चुका असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान ह्या चुका आपल्याला आता CoWIN अ‍ॅपमध्ये सुधारता येणार आहेत, त्याचीच माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.


केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधित नागरिकांचा शोध घेण्यासाठी आरोग्य सेतु अ‍ॅप काढले होते. आरोग्य सेतुने आपल्या ट्विटर हँडलवर लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र प्रक्रिया सांगितली आहे. यात या प्रमाणपत्रातील चुका कशा सुधारायच्या हे देखील सांगितले आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (बुधवार) CoWin अ‍ॅपमध्ये Raise an issue विशेष फीचर जोडल्याची माहिती दिली आहे.

अशा प्रकारे CoWIN अॅपद्वारे प्रमाणपत्रातील चुका करा दुरुस्त

  • सर्वप्रथम http://cowin.gov.in येथे क्लिक करा
  • आपला १० अंकी मोबाइल नंबर प्रविष्ट करुन साइन इन करा
  • आपल्या फोनवर प्राप्त केलेला 6 अंकी ओटीपी प्रविष्ट करा
  • त्यानंतर Account Details वर जा
  • जर तुम्हाला तुमचा पहिला किंवा दुसरा डोस मिळाला असेल तर तुम्हाला Raise an Issue बटण दिसेल
  • त्यानंतर Correction in certificate वर क्लिक करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या आवश्यक सुधारणा प्रमाणपत्रात करा