मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट; पुढचे चार ते पाच दिवस सुरुच राहणार पावसाचा धुमाकूळ


मुंबई – मुंबईत दाखल झालेला मॉन्सून रौद्ररुप धारण करत असतानाच आता मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढचे चार दिवस धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. येत्या चार दिवसांमध्ये मुंबईसह कोकण किनारपट्टीतही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आज मॉन्सूनचे आगमन झालेले आहे. सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. पुढच्या चार दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.