भारतातील मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण


नवी दिल्ली – उद्या म्हणजेच १० जून रोजी या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण होणार आहे. तर हे वर्षातील दुसरे ग्रहण असणार आहे. याआधी पहिले चंद्रग्रहण २६ मे रोजी झाले होते. सूर्यास्ताच्या आधी हे सूर्यग्रहण फक्त अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येच दिसणार आहे. भारताच्या इतर भागातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही. जरी हे पूर्ण सूर्यग्रहण असेल, तरी भारतात ते अर्धवट स्वरूपात दिसणार आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी १.४२ वाजता हे ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी ६.४१ वाजता संपणार आहे. हे सूर्यग्रहण अरुणाचल प्रदेशातील दिबंग वन्यजीव अभयारण्याजवळून संध्याकाळी ५:५२ वाजता पाहता येणार आहे. तर लडाखच्या उत्तरेकडील भागात ते संध्याकाळी ६ च्या सुमारास दिसेल.

उत्तर अमेरिका, उत्तर कॅनडा, युरोप आणि आशिया, ग्रीनलँड, रशियाच्या बऱ्याचशा भागांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये अंगठीच्या आकाराप्रमाणे दिसणार आहे. तर उत्तर अमेरिका, युरोप आणि उत्तर आशियाच्या बऱ्याच भागांत हे केवळ अर्धवट स्वरुपात दिसेल. ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार हे सूर्यग्रहण १४८ वर्षांनी जेष्ठ अमावस्येला हे ग्रहण दिसणार आहे. गुरुवारी म्हणजे १० जून रोजी हे ग्रहण लागणार आहे.