नुसरत जहाँचा खुलासा; निखिल जैनशी झालेला विवाह कायद्याच्या दृष्टीने अवैध !


कोलकाता – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या मोडलेल्या विवाहाची बरीच चर्चा रंगली होती. अनेक तर्क-वितर्क देखील त्यावरून लावले जाऊ लागले होते. अखेर नुसरत जहाँ यांनीच खुद्द या प्रकरणावर खुलासा केला आहे. यासाठी त्यांनी ७ मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारे जाहीर निवेदनच काढले असून त्यांनी त्यामध्ये निखिल जैनसोबत झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध असल्याचा खुलासा केला आहे. तसेच, हा विवाह तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत. नुसरत जहाँ यांनी ७ मुद्द्यांच्या आधारे केलेल्या स्पष्टीकरणामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर दावे केले आहेत.

नुसरत जहाँ या निवेदनात आपल्या विवाहासंदर्भात म्हणतात, तुर्की कायद्यानुसार आमचे लग्न झाले होते. भारतीय विशेष विवाह कायद्यानुसार ते वैध होणे आवश्यक होते. पण ते झाले नाही. येथील कायद्यानुसार ते लग्न नव्हते, तर फक्त एक नाते किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होते. त्यामुळे औपचारिक घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही. फार पूर्वीच आम्ही वेगळे झालो आहोत. फक्त मी त्यावर भाष्य टाळले होते. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचे कारण नसल्याचे नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आपल्या पैशांचा आपल्या परवानगीशिवाय वापर होत असल्याचा आरोप नुसरत जहाँ यांनी केला आहे. जे स्वत: श्रीमंत असल्याचा दावा करत आहेत, त्यांनीच माझ्या बँक खात्यामधून अवैधरित्या पैसे काढले आहेत. हा प्रकार आम्ही वेगळे झाल्यानंतर देखील सुरूच होता. मी बँकेकडे यासंदर्भात तक्रार केली असून पोलिसात देखील लवकरच तक्रार करणार असल्याचे नुसरत जहाँ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.


नुसरत जहाँ यांनी निवेदन जाहीर करण्याआधी आपल्या इन्स्टाग्रामवर एक सूचक पोस्ट देखील केली होती. मला इतिहास तोंड बंद ठेऊ शकणारी महिला म्हणून ओळखणार नाही. आणि माझी त्याला काहीही हरकत नसल्याचे नुसरत जहाँ या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

नुसरत जहाँ यांनी निखिल जैन याच्यावर या स्पष्टीकरणात्मक निवेदनामध्ये अनेक आरोप केले आहेत. लग्नावेळी माझ्या कुटुंबियांनी मला दिलेले दागिने, माझ्या स्वत:च्या कमाईतून घेतलेले दागिने, माझे कपडे, बॅग्ज आणि इतर गोष्टी त्याने त्याच्याकडेच ठेऊन घेतल्या असल्याचे नुसरत जहाँ यांनी या खुलाशामध्ये म्हटले आहे.

मी माझा संबंध नसलेल्या कुणाबाबतही किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणार नाही. प्रसारमाध्यमांना माझी विनंती आहे की माझ्याशी बऱ्याच काळापासून संबंधित नसललेल्या व्यक्तीला तुम्ही काहीही प्रश्न विचारू नका. एका व्यक्तीला माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हिरो करून एकतर्फी माहिती देणे अपेक्षित नाही. अशा व्यक्तींना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये, अशी मी माध्यमांना विनंती करते, असे देखील नुसरत जहाँ यांनी या निवेदनात म्हटले आहे.

२०१९मध्ये उद्योजक निखिल जैनशी नुसरत यांनी लग्न केले होते. सोशल मीडियावर त्या दोघांचे लग्नातील फोटो चर्चेत होते. पण नुसरत आणि निखिल यांच्या नात्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचबरोबर नुसरत या एसओएस कोलकाता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे यशने म्हटले होते.