रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांना उद्यापासून सकाळी 9 ते 4 यावेळेत मुभा


रत्नागिरी – उद्यापासून गेले आठवडाभर रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेला लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा हा राज्य सरकारच्या घोषणेनुसार चौथ्या स्तरावर येत असल्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. रेस्टॉरन्टना केवळ पार्सलसेवा आणि होम डिलिव्हरी करता येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात शनिवार आणि रविवारी पूर्णवेळ संचारबंदी राहणार आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जाहीर केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 3 जून ते 9 जून दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता़. जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्हीटी रेट 13.90 टक्के आहे आणि ऑक्सीजन बेडची व्याप्ती 54.81 टक्के आहे. त्यामुळे राज्यसरकारने जाहीर केल्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा हा चौथ्या स्तरामध्ये येतो़. उद्यापासून जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे, सायकलिंग सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहणार आहे आणि शनिवार, रविवारी बंद राहतील.

शासकीय कार्यालयात आणि सुट असलेल्या खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थिती राहील. लग्न समारंभासाठी 25 लोकांच्या उपस्थितीची परवानगी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून घ्यावी लागणार आहे. अंत्यविधीलाही 20 लोकांचीच उपस्थिती असेल. ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय आहे, अशीच बांधकामे सुरु राहतील. सोमवार ते रविवार सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कृषी आणि कृषी पुरक सेवा सुरु राहतील.

अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्व ई-कॉमर्स सेवा सुरु राहतील. व्यायामाशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. पण या ठिकाणी लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक केले आहे. तसेच 50 टक्के क्षमतेसह सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु राहतील. मालवाहतूक नियमित सुरु राहील. प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास नियमित सुरु राहील. मात्र पाचव्या स्तरावरील जिल्ह्यातून येण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल. अशा प्रकारच्या अटींचा या आदेशात समावेश आहे.