बाबा रामदेव यांच्या कोरोनिलवर नेपाळमध्ये बंदी


काठमांडू: कोरोनाने देशात शिरकाव केल्यानंतर दिवस-रात्र मेहनत घेऊन अनेकांनी यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनिल या औषधाची निर्मिती करत कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला होता.

पण, याच्या वापराला भारतात मान्यता देण्यात आली नाही. यानंतर शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळ, भूतान येथेही कोरोनिल पाठवण्यात आले होते. पण आता बाबा रामदेव यांना नेपाळ सरकारने धक्का देत कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या संसर्गाविरोधात कोरोनिल औषध प्रभावी असल्याचा एकही ठोस पुरावा नसल्याचे नेपाळने म्हटले आहे. स्थानिक वृत्तानुसार, कोरोनिलच्या १५०० किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. तसे आदेश नेपाळच्या आयुर्वेद आणि पर्यायी औषध विभागाने दिल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनिलच्या १५०० किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात न आल्यामुळेच कोरोनिलचे वितरण तात्काळ थांबविण्यात आले आहे. नेपाळमध्ये कोरोनिलचे १५०० किट बाबा रामदेव यांनी मोफत पाठवले होते. कोरोनिल किटमधील औषधे कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी नसल्याचे नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलवर बंदी घालण्याबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

नेपाळ हा कोरोनिलच्या वितरणावर बंदी घातलेला दुसरा देश आहे. भूतानच्या औषध नियामक प्राधिकरणाने या औषधाच्या वितरणावर अलीकडेच बंदी घातली. पण, दुसरीकडे कोरोनिल किट अद्याप नेपाळमध्ये नोंदणीकृत झालेले नसल्यामुळे त्याची व्यावसायिक विक्री अथवा वितरण होऊ शकत नाही. नेपाळ सरकारला कोरोनिल किट भेट म्हणून देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण देत आवश्यक इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पतंजलीने म्हटले आहे.