अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना पुढील महिन्यापासून यासेवेसाठी मोजावे लागणार जास्त पैसे


नवी दिल्ली – तुमचे खाते जर अॅक्सिस बँकेत असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. अॅक्सिस बँक पुढील महिन्यापासून आपल्या सेवेत एक मोठा बदल करणार आहे. SMS अलर्ट सेवेसाठी पुढील महिन्यापासून तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च मोजावे लागणार आहेत. बँक SMS अलर्टवरील शुल्कात वाढ करणार आहे. बँकेने मागील महिन्यातही बचत खात्यावर अनेक प्रकारचे शुल्क वाढविले होते. पुढील महिन्यापासून SMS अलर्टवर बँक किती शुल्क आकारणार याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

अॅक्सिस बँक जुलै 2021 पासून SMS अलर्टसाठी ग्राहकांकडून 25 पैसे आणि जास्तीत जास्त 25 रुपये शुल्क आकारणार आहे. यामध्ये प्रचारात्मक SMS आणि व्यवहाराच्या प्रमाणीकरणासाठी (authentication) पाठविलेले OTP यांचा समावेश नसेल.

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सुरू केलेली नवीन यंत्रणा लक्षात घेऊन बँकेने SMS शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अॅक्सिस बँकेकडून दरमहा 5 पैसे प्रति SMS शुल्क आकारले जात होते, परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर ते प्रति SMS 20 पैसे होतील.

बँकेने गेल्या महिन्यात खात्यातून किमान शिल्लक, रोख रक्कम काढणे अशा अनेक नियमांमध्ये बदल केले होते. किमान सरासरी शिल्लक मर्यादा अ‍ॅक्सिस बँकेने वाढविली होती. बँकेच्या सुलभ बचत योजनांसाठी खात्यातील किमान शिल्लक रक्कम 10,000 रुपयांवरून 15,000 रुपये केली होती. त्याचवेळी शहरी आणि ग्रामीण भागातील प्राईम आणि लिबर्टी बचत खात्यांची किमान शिल्लक आवश्यकता 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती.

अ‍ॅक्सिस बँकेतून पैसे काढणे देखील पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. अ‍ॅक्सिस बँक दरमहा 4 एटीएम व्यवहार किंवा 2 लाख रुपयांचे विनामूल्य व्यवहार देते. यानंतर, अतिरिक्त व्यवहारासाठी शुल्क द्यावे लागेल. 1 मेपासून आता विनामूल्य मर्यादेनंतर 1000 रुपये रोख काढण्यासाठी ग्राहकांना 10 रुपये द्यावे लागतील.