श्रीअम्मा यंगर अयप्पन म्हणजे कोण?

बॉलीवूड तारे तारका यांचे जीवन, त्यांचे राहणीमान याविषयी अनेकांना कुतूहल असते. एखादा खास नट किंवा नटी तिच्यातील अभिनय कौशल्यामुळे, कधी स्टाईल मुळे रसिकांच्या मनावर राज्य करते. त्यांचे नाव अनेकांच्या प्रातःस्मरणाचा भाग असतो. पण हे नाव मुळात वेगळेच असेल तर? बॉलीवूड मधील अनेक नामवंत कलाकारांनी त्यांच्या सध्याच्या नावावर लोकप्रियता मिळविली असली तरी त्यांची ती नावे खरी नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे मूळ नाव काय हेही अनेकांना माहिती नसते. ही यादी बरीच मोठी आहे.

आता तुम्हाला श्रीअम्मा यंगर अयप्पन म्हणजे कोण असे विचारले गेले तर चटकन सांगता येणार नाही. ही व्यक्ती म्हणजेच रसिकांच्या दिलाची धडकन श्रीदेवी. शिल्पा शेट्टी खरी अश्विनी शेट्टी आहे हेही अनेकांना माहिती नसेल.

हिरो जॅकीचे खरे नाव आहे जयकिशन काकूभाई. तर देवोल परिवारातील सनी आणि बॉबी अनुक्रमे अजयसिंग देओल आणि विजयसिंग देओल आहेत. अगदी अलीकडे बॉलीवूड मध्ये आलेली कियारा अडवाणी खरी आलीया अडवाणी आहे पण तिच्या अगोदरच आलिया भट्ट लोकप्रिय झाल्याने आलिया कियारा बनून बॉलीवूड मध्ये आली आहे. तब्बूचे खरे नाव तबस्सुम हाश्मी खान असे आहे हेही अनेकांना माहिती नाही.

बाहुबली नावाने चित्रपटसृष्टी गाजविणारा प्रभास मुळचा वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती आहे हे सांगून खरे वाटेल? जॉन अब्राहम याचे खरे नाव फरहान अब्राहम आहे हे फार थोड्यांना माहिती आहे.

विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर मुळातला जॉन राव प्रकाश राव जानुमला आहे तर सैफअली खान मुळचा साजिद अली खान आहे. हॉट मल्लिका शेरावत खरी रिमा लांबा आहे तर अजय देवगण आहे विशाल देवगण. सनी लीयोनीचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे तर जयाप्रदा मुळची लीला रानी आहे.

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलीवूड मध्येही गाजलेला कमल हासन मुळचा पार्थसारथी श्रीनिवासन आहे आणि महिमा चौधरी आहे ऋतू चौधरी. एके काळाचा सुपरस्टार राजेश खन्ना मुळचा जतीन खन्ना तर जितेंद्र मुळचा रवी कपूर. हिंदी चित्रपट जगतातील सर्वात वयोवृद्ध दिलीप कुमार यांचे मूळ नाव युसुफखान आहे. ही यादी येथेच संपत नाही. पण सध्या इतकेच पुरे.