बहादूर उंदराची निवृत्ती

आफ्रिकी जातीचा एक उंदीर जगात हिरो म्हणून प्रसिद्ध असल्याची खबर अनेकांना नसेल. त्याच्या बहादुरीचे किस्से ऐकण्यासारखे आहेत. मगावा नावाचा हा उंदीर सात वर्षाचा आहे मात्र त्याने आजपर्यंत हजारो लोकांचे जीव वाचविले आहेत. सर्वसाधारण उंदीर ही उच्छाद निर्माण करणारी जमात मानली जाते. मात्र मगावा हा मुळात सर्वसाधारण उंदीर नाही. तर वास घेऊन स्फोटके, भूसुरुंग शोधण्यासाठी त्याला खास प्रशिक्षण दिले गेले आहे. आता तो पाच वर्षाच्या नोकरीनंतर निवृत्त होत आहे.

दक्षिण पूर्व आशियाई देश कंबोडिया येथे स्फोटके आणि भूसुरुंग शोधण्याचे काम मगावाने अतिशय जबाबदारीने पार पाडले आहे. त्याची देखभाल करणारी महिला सांगते, भूसुरुंग अथवा स्फोटके नुसत्या वासाने ओळखून तो मला सावध करत असे. त्याने त्याच्या ५ वर्षाच्या या नोकरीत ७१ भूसुरुंग आणि ३८ जिवंत स्फोटकांचा पत्ता लावून हजारो जीव वाचविले आहेत.

बेल्जियमच्या स्वयंसेवी एपीओपीओ संस्थेने मगावाला प्रशिक्षण दिले आहे. त्याने १.४ लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जमिनीची तपासणी केली आहे. मगावाला ‘ब्रिटीश चॅरिटी’ मेडलने सन्मानित केले गेले आहे. हा पुरस्कार आजपर्यंत प्रामुख्याने शूर कुत्र्यांसाठी आरक्षित होता. प्रथमच एका उंदराला हा सन्मान देण्यात आला आहे.

२०१६ साली वयाच्या दुसऱ्या वर्षी मगावा कंबोडियात कामावर रुजू झाला आणि आता ७ व्या वर्षी तो निवृत्त होत आहे. त्याची हँडलर सांगते, ‘ तो छोटा असू दे पण त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केल्याचा मला अभिमान आहे. तो अजूनही काम करण्यास सक्षम आहे पण आता त्याला विश्रांती मिळायला हवी.’ निवृत्तीनंतरही मगावा त्याच्या पहिल्याच पिंजऱ्यात राहणार असून त्याची दिनचर्या पहिल्याप्रमाणेच असेल. त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे.