आता सीएनजी सुद्धा फिरत्या वाहनातून मिळणार

पेट्रोल पंपावर लागणाऱ्या रांगा कमी होण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलची घरपोच डिलीव्हरी सुरु केल्यानंतर आता सीएनजी सुद्धा फिरत्या वाहनातून पुरविण्याची सुविधा देशात सुरु झाली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी मंगळवारी सीएनजी फिरत्या इंधन आपूर्ती सुविधेचे उद्घाटन करताना ही माहिती दिली. अशी सुविधा देणारे पहिले केंद्र इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने दक्षिण दिल्लीत सुरु केले आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ही कंपनी सेवा देणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात इंधन आपुर्ती सुविधा युनिट महानगर गॅस लिमिटेडने रायगड मध्ये तैनात केले आहे. या वाहनात १५०० किलो सीएनजी ठेवता येतो व दररोज साधारण १५० ते २०० वाहनांना उपलब्ध करून दिला जातो. जेथे सीएनजी स्टेशन जवळ नाही तेथे ही वाहने उपयुक्त ठरतात.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या केंद्राचे उद्घाटन केल्यावर देशभरात २०१ सीएनजी स्टेशन राष्ट्राला समर्पित करण्यात आल्याची घोषणा केली. ते म्हणाले सुरवातीला सीएनजी आणि पाईप गॅस फक्त महानगरात उपलब्ध होता पण आता निमशहरी भागात आणि छोट्या शहरात ही सुविधा दिली जात आहे. २०३० पर्यंत नैसर्गिक वायू उर्जेचा खप ६.२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेला जाणार आहे. हायड्रोजन, बायोगॅस, इथेनॉल मिश्रित पेट्रोल, एलएनजी अशा स्वच्छ इंधन वापरावर जोर देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इंडीयन ऑइल बडोदा येथे लवकरच हायड्रोजन स्टेशन सुरु करत असल्याची माहिती त्यांनी दिली.