यंदा दणकून खर्च करणार भारतीय

करोना काळात थंडावलेली अर्थव्यवस्था करोनाचा जोर कमी झाल्यावर हळूहळू रुळावर येईलच पण करोनाच्या केसेस मधली घट, लॉक डाऊनचे कमी होत असलेले निर्बंघ यामुळे व्यवसाय व्यापार पुन्हा सुरळीत होऊ लागल्याचे संकेत मिळाले आहेत. फीच सोल्यूशनने मंगळवारी सादर केलेल्या अहवालानुसार २०२१ मध्ये ग्राहक खर्चाच्या प्रमाणात ९.१ टक्के वाढ होऊन येत्या सहामाहीत भारतीय दणकून खर्च करतील असे म्हटले गेले आहे.

गतवर्षी करोना, लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्या होत्या आणि एकूण ग्राहक खर्चात ९.३८ टक्के घट झाली होती. आउटलुक २०२१च्या रिपोर्ट नुसार यंदा आगामी सहामाहीत भारतीय ग्राहक ७३.३ लाख कोटी खर्च करतील. करोना पूर्व काळात हा आकडा ७४ लाख कोटी होता मात्र मागील वर्षी त्यात मोठी घट झाली होती.

यंदा घरेलू खर्चात वाढ होणार आहे. महागाईचा दबाब नागरिकांवर आहेच पण इंधन दरवाढ, करांचे ओझे, उत्पादनांवरचा अप्रत्यक्ष कर यामुळे ग्राहकांना अधिक खर्च करावा लागणार आहे. महागाईचा थेट परिणाम कुटुंबाच्या बजेटवर होणार आहे. अनेकांना पुन्हा नोकऱ्या मिळत आहेत पण त्यात कमी तास, कमी वेतन असेही प्रकार आहेत असे या अहवालात म्हटले गेले आहे.